गरीब शेतकर्यांसाठी लवकरच कर्जमाफीची घोषणा : चंद्रशेखर बावनकुळे
Loan waiver for poor farmers will be announced soon: Chandrashekhar Bawankule मुंबई (3 फेब्रुवारी 2026) : गरीब शेतकर्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार असून सरकारने दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा विश्वास धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे झालेल्या सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे शेतात राबणार्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकर्यांचा विचार न करता खर्या अर्थाने गरजू शेतकर्यांनाच या निर्णयाचा लाभ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार शेतकर्यांच्या बाजूने
बावनकुळे यांनी कर्जाच्या वाढत्या व्याजदरांवर भाष्य करताना सांगितले की, कर्जावर व्याज आणि त्यावर पुन्हा व्याज वाढत जात असल्यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली जातात आणि आत्महत्येचा विचार करतात. अशा परिस्थितीत सरकार शेतकर्यांना एकटे सोडणार नाही, असा दिलासाही त्यांनी दिला.

गरीब शेतकरी 40-40 वर्षे शेतात राबतात, कर्जबाजारी होतात आणि शेवटी हताश होतात; पण आम्ही त्यांना आत्महत्येपर्यंत जाऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच कर्जमाफीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभरातील शेतकरी आता या निर्णयाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. मात्र, बावनकुळे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ही कर्जमाफी फक्त गरीब शेतकर्यांसाठीच असेल. त्यामुळे गरीब शेतकरी, या निकषात नेमके कोण बसतील, कोणत्या शेतकर्यांना वगळले जाईल, आणि गरिबी ठरवण्याचे मापदंड काय असतील, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, सरकारचा प्रयत्न केवळ कर्जमाफीपुरता मर्यादित नसून भविष्यात शेतकर्यांना कर्ज घ्यावेच लागू नये, असा व्यापक विचार केला जात आहे. शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीच्या आणि स्थिरतेच्या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी संकेत दिले. यामुळे कर्जमाफी ही तात्पुरती मदत असली तरी दीर्घकालीन उपाययोजनांवरही सरकार काम करत असल्याचे चित्र समोर आले.







