शरद पवार स्पष्टच म्हणाले ; राष्ट्रवादी विलीनीकरणावर बोलण्याचा देवेंद्र फडणवीसांना अधिकार काय ?
Sharad Pawar clearly stated: What right does Devendra Fadnavis have to speak about the NCP’s merger? मुंबई (4 फेब्रुवारी 2026) : अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस त्या चर्चेत सहभागी नव्हते मग त्याबद्दल बोलण्याचा त्यांना काय अधिकार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मला आनंद आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराबाबत सावधगिरीचा इशारा दिला. कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची तरतूद या करारात असण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली. ही बाब देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते, असे त्यांचे मत होते.

अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केले समाधान
या पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही भाष्य केले. संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळे यावेळी दिल्लीला जाता आले नाही, असे त्यांनी सांगितले. सभागृहात थेट उपस्थित राहून अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार काही मुद्दे लक्षात येतात, असे ते म्हणाले. सामान्य नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकलेला नाही, ही बाब समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, अर्थसंकल्पातून विकासाला अधिक चालना देणार्या ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, असे पवार यांनी नमूद केले. केवळ करसवलती किंवा कर न वाढवणे यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अधिक ठोस निर्णय आवश्यक होते, अशी त्यांची भूमिका होती. विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक असलेले काही निर्णय अर्थसंकल्पात दिसून आले नाहीत, असे ते म्हणाले.







