एरंडोल तालुका हादरला : 30 वर्षीय अनोळखी महिलेची जाळून हत्या
Erandol taluka shaken : 30-year-old unknown woman burned to death एरंडोल (4 फेब्रुवारी 2026) : एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साधारणतः 30 वर्षीय महिलेची हत्या करीत तिला जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवार, 4 रोजी उघडकीस आलेल्या या घटनेने एरंडोल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मयत महिलेची ओळख पटवण्यासह आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
काय आहे नेमका प्रकार ?
जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात बुधवारी एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास काही नागरिकांना जंगलात संशयास्पद मृतदेह दिसून आल्यानंतर पोलिसांना घटना कळवण्यात आली. मयत महिलेचा देह कंबरेपासून वरच्या भागात पूर्णपणे जळालेला आहे त्यामुळे तिची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

दोन दिवसांपूर्वी खून झाल्याची शक्यता
एरंडोल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे बिअरची बाटली आढळल्याने मारेकर्यांनी मद्यधुंद अवस्थेत हा गुन्हा केला असावा किंवा महिलेला गुंगीचे पेय देऊन तिची हत्या केल्याचा संशय आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खून दोन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
फॉरेन्सिक टीम दाखल
पुराव्यांची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यातील बेपत्ता महिलांच्या नोंदीवरून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.







