विद्यार्थी परीषदेवर काम केल्याने चंद्रकांतदादांना भाजपाचा इतिहास ठावूक नाही
माजी मंत्री खडसेंचा पलटवार : कुणाला तरी विचारून प्रदेशाध्यक्ष बोलत असल्याचा दावा
मुक्ताईनगर : चंद्रकांतदादा विद्यार्थी परीषदेतून भाजपा पक्षात आल्याने त्यांना भाजपा पक्षाचा इतिहास कदाचित माहित नाही, पक्ष कुणी वाढवला, काय-काय घडामोडी घडल्या हे त्यांना माहित नाही मात्र कुणीतरी त्यांना सांगत आहेत वा ते कुणाला विचारून बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीनंतर व्यक्त केली आहे.
खडसेंनी पुन्हा केली टिका
विधान परीषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं नाराज झालेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार टीका केल्यानंतर या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत खडसेंच्या घरात अनेक पदे दिल्याचे सांगितल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती व नंतर पुन्हा खडसेंनी पुन्हा पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.


जे मिळवले ते हिंमतीवर मिळवले
खडसे म्हणाले की, आतापर्यंत आम्ही जे काही मिळवलं, ते स्वत:च्या हिंमतीवर मिळवलं आहे, पक्षाने आम्हाला दिले हे मान्यच आहे मात्र आम्ही पक्षासाठी काहीच केले नाही का? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की, ज्यावेळी कुणीही पक्षात यायला तयार नव्हतं, उमेदवारी घेत नव्हतं, त्या काळात मी निवडून येत होतो. मी आतापर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झालेलो नाही. मला सहा वेळा पक्षाने तिकीट दिले आहे, सात वेळा नाही, असे सांगत ते म्हणाले की, आता पक्षात सक्रीय झालेल्या चंद्रकांत दादांना हा कदाचित इतिहास माहित नाही, कदाचित त्यांना कुणीतरी सांगत असावं व बोलत असावेत.
खडसेंनी दादांना पाठवला फोटो
चंद्रकांत दादा हे आत्ताच चार वर्षांपूर्वी भाजपात आले आहेत , यापूर्वी त्यांनी विद्यार्थी परीषदेवर काम केल्याने कदाचित त्यांना भाजपाचा इतिहास ठावूक नसावा, असे सांगून खडसे म्हणाले की, 1981 मध्ये चारचाकीवर भाजपाचा लाऊडस्पीकर लावून प्रचार करतानाचा आपण फोटोदेखील पाठवला असल्याची आठवण खडसे यांनी करून दिली.
