मालेगावात मोठा अनर्थ टळला : मनपात लिप्ट कोसळली ; 18 जणांची भिंत तोडून सुटका
A major tragedy was averted in Malegaon : A lift collapsed in the municipal corporation building ; 18 people were rescued by breaking down a wall मालेगाव (7 फेब्रुवारी 2026) : मालेगाव मनपात महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून 18 प्रवाशांसह असलेली लिफ्ट अचानक खाली कोसळली. सुदैवाने ही लिफ्ट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्याच्या दरवाज्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी 18 जणांची भिंत तोडून सुटका करण्यात आली.
काय घडले मनपात ?
शनिवारी मालेगाव महापालिकेत नूतन पदाधिकार्यांच्या निवडीचा उत्साह असताना ही घटना घडली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार अर्थात 18 नागरिक झाल्याने आणि अचानक लिफ्टची चैन तुटल्याने ही दुर्घटना घडली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट वेगाने खाली येत असताना ती पहिल्या मजल्यावर अडकली. लिफ्ट कोसळल्याच्या आवाजाने आणि नागरिकांच्या ओरडण्याने महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली.
भिंत तोडून करण्यात आली सुटका
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतली. लिफ्ट पहिल्या मजल्यावर अशा ठिकाणी अडकली होती की तिचा दरवाजा उघडणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. अखेर बचाव पथकाने पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नाने अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
लिफ्टची देखभाल नसल्याचे घडला अनर्थ
या लिफ्टमध्ये ‘इस्लाम पार्टी’चे नेते आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नवनियुक्त नगरसेवक आणि पाच पत्रकारांचा समावेश होता. सर्वांची सुखरूप सुटका झाल्यानंतर प्रशासनासह राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. लिफ्ट जर आदळली असती, तर त्यातून स्फोट होण्याचीदेखील शक्यता होती. पण सुदैवाने असे काही झाले नाही. लिफ्टमधील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या लिफ्टची देखभाल डागडुजी झाली नव्हती, यामुळे घटना घडल्याचे म्हटले जात आहे.


