गडचिरोलीत सात जहाल नक्षल्यांचा खात्मा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऑपरेशनचे कौतुक


Seven hardcore Naxalites were eliminated in Gadchiroli: Chief Minister Devendra Fadnavis praised the operation नागपूर (7 फेब्रुवारी 2026) : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी लढ्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी 60 जवानांनी अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत राबवलेल्या मोहिमेमध्ये सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑपरेशनचे कौतुक करत सी 60 जवानांचे आणि पोलिसांचे अभिनंदन केले.

सात नक्षलवाद्यांचा खात्मा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची एकच कंपनी शिल्लक होती आणि त्या कंपनीतील प्रमुख सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलात पार पाडण्यात आले. या भागात यापूर्वी फारशा मोहिमा झालेल्या नव्हत्या. तीन दिवस सलग पोलिसांनी या जंगलात तळ ठोकून रणनीती आखली. दोन बाजूंनी घेरा घालून नक्षलवाद्यांना अडवण्यात आले आणि त्यानंतर जोरदार चकमक झाली.

नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकरचा खात्मा
या चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. तरीही पोलिसांनी संयम, धैर्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या मोहिमेत सात नक्षलवादी ठार झाले असून त्यामध्ये नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकर याचाही समावेश आहे. प्रभाकर हा कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी होता तसेच गडचिरोली विभागीय कमिटी आणि वेस्ट सब-झोनल ब्युरोचा प्रभारी म्हणून तो कार्यरत होता. त्याच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते.

नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने राज्य पोलिस दलाचे प्रयत्न
या कारवाईनंतर राज्यातील नक्षलवादी ताकद आता फारच मर्यादित राहिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या बाजूने आता फक्त बोटावर मोजण्याइतके, म्हणजे तीन ते चार मोठे नक्षलवादी उरले आहेत. वेगाने नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने राज्य पोलिस दलाचे प्रयत्न सुरू आहेत. सी60 जवानांच्या शौर्यामुळे आणि चिकाटीमुळे हे यश मिळाले आहे. या यशस्वी मोहिमेत दुर्दैवाने एक पोलिस जवान शहीद झाल्याने या जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !