धक्कादायक : नगरदेवळ्यात पोलिस उपनिरीक्षकाचे घर जाळण्याचा प्रयत्न


पाचोरा (9 फेब्रुवारी 2026) : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून धक्कादायक बातमी समारे आली आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल रात्री सुमारे 2.30 ते 3 वाजेदरम्यान घडला. सुदैवाने घरातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

मध्यरात्रीच्या सुमारास घटना
दोन अज्ञात इसम नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून घटनास्थळी आले होते. राऊळ गल्लीतील गणपती मंदिराजवळ दुचाकी उभी करून एक हल्लेखोर लोखंडी गेटवरून उडी मारत थेट घराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचला. त्याने बिलसरीच्या बाटलीतून पेट्रोल ओतून दरवाजावर आग लावली आणि दोघेही अंधारात पसार झाले.

दरवाज्याजवळील पडद्याने तात्काळ पेट घेतल्याने घरात धूर पसरला. त्याचवेळी नंदकौर राऊळ यांना पेट्रोलचा तीव्र वास आणि उष्णतेची जाणीव झाली. त्यांनी तत्काळ आपली मुलगी किरण राऊळ यांना उठवले. सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय होता. मात्र दरवाज्याजवळ लागलेली आग पाहताच त्यांनी धाडस दाखवत पाण्याच्या साहाय्याने आग विझवली.

आग विझवल्यानंतर बाहेर पाहणी केली असता पेट्रोलची रिकामी बिलसरी बाटली, माचिस पेटी आणि जळालेली आगकाडी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.

शेजारील किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री 2.58 वाजता नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर दोन व्यक्ती आलेल्या स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. हे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात जाळपोळ करण्याचा प्रयत्न, जीवितास धोका निर्माण करणे आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणे अशा गंभीर कलमान्वये किरण उमेश राऊळ (32, नगरदेवळा, ता.पाचोरा) यांच्या फिर्यादीवरुन दोन अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शरनाखाली उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !