विवाहितेचा जळाल्याने मृत्यू : पतीच्या कथित प्रेयसीसह चौघांविरोधात गुन्हा
कळवण (11 फेब्रुवारी 2026) : पतीला कथित प्रेयसीबाबत विचारणा करणार्या 31 वर्षीय विवाहितेचा जळाल्याने मृत्यू झाल्याचखी घटना कळवण येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयताच्या पती, प्रेयसीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली.
विवाहिता जळालेल्या अवस्थेत आढळली
कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय वसाहतीमध्ये पूजा छजलानी (31) या पती सुरज छजलानी आणि सासरकडच्या लोकांसोबत राहत होत्या. याच ठिकाणी 30 नोव्हेंबर 2025 रोजी त्या जळालेल्या अवस्थेमध्ये आढळल्या होत्या. त्यानंतर पूजा यांच्यावर मागील जवळपास अडीच महिन्यांपासून उपचार सुरू होते मात्र नुकताच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत पूजा हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती, सासू, नणंद आणि पती सुरज याच्या कथित प्रेयसीविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमसंबंधाबाबत केली विचारणा
पूजा छजलानी हिचा विवाह दिनांक 25 नोव्हेंबर 2013 साली सुरज छजलानी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर घरातील काम आणि मानपानाच्या कारणाहून वेळोवेळी पूजा हिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात आला. पूजा ला पती सूरज याच्या अनैतिक प्रेमसंबंधांबाबाबत संशय आल्यानंतर तिने त्याला जाब विचारला मात्र हा जाब विचारला असता, तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं देखील पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
उपचारादरम्यान झाला मृत्यू
30 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पूजा ही जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. तात्काळ तिच्यावर नाशिक त्यानंतर मुंबई येथे उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने 7 फेब्रुवारी रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूजा ही संशयास्पदरित्या जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यामुळे पूजाच्या माहेरच्या लोकांनी पोलीस ठाणे गाठून तिचा भाऊ बॉबी अशोक राजपाल याने कळवण पोलीस ठाण्यात पूजाचा पती सुरज छजलानी, सासू ,ननंद, आणि संशयित सुरज याची कथित प्रेयसी या चौघांवर कळवण पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संशयित सुरज छजलानी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.






