जळगावातील तरुणला गावठी कट्यासह पकडले : गुन्हे शाखेची कारवाई
Youth from Jalgaon caught with village knife : Crime Branch action जळगाव (12 फेब्रुवारी 2026) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने 21 वर्षीय युवकाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अटक केली. मोहम्मद साद अय्युब खान (रा. शाहूनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणार्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. उस्मानिया पार्क आणि शिवाजीनगर परिसरात एक तरुण मोटरसायकलवर बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याचे समजताच, पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचला.

संशयित मोहम्मद साद हा परिसरात दिसताच पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेले शस्त्र त्याने कोठून आणले आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापूरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सहा फोजदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बारोस्कर, किलेश सोनवणे, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांच्या पथकाने केली. हवालदार सुनील पाटील तपास करीत आहेत.






