धुळे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : थरारक पाठलागाअंती चैन चोरट्यांना बेड्या
Dhule Crime Branch’s big achievement : Chain thieves arrested after thrilling chase धुळे (14 फेब्रुवारी 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतीय चैन चोरट्यांचा थरारक पाठलाग करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. संजू मुकेश शर्मा (28, रा.पानिपत बबेल रोड, भारत नगर, हरियाणा) व नितीन कुमार किसन कुमार (वय 24, रा. अल्लाउद्दीनपूर, सामली, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून एक लाख 30 हजार रुपये किंमतीचे 17.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
नेमके प्रकरण काय ?
धुळ्यातील आकांक्षा भरत बोरसे (32, व्यवसाय गृहिणी, रा. प्लॉट क्रमांक 11/ब, वानखेडकर नगर, देवपूर, धुळे) या 12 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या मुलीला शिकवणीवर्गातून घरी आणण्यासाठी जात असतान, काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गर्भावस्थेचा गैरफायदा घेत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व महिलेला धक्का देत पोबारा केला होता. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने धाव घेत पाहणी केली तसेच आरोपींचा शोध सुरू केला होता.

पाठलाग करीत आरोपी जाळ्यात
गांधी पुतळा परिसरात मिळालेल्या वर्णनाशी जुळणारे दोन इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगात जाताना दिसून आल्यानंतर पोलिसांनी धैर्याने कारवाई करत एका आरोपीस ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिस पथकाने तत्काळ पाठलाग सुरू ठेवत दुसर्या आरोपीलाही शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मनी मंगळसूत्र, काळ्या रंगाची पिशवी, दुचाकी, दोन मोबाईल, हेल्मेट, टोपी आणि कपडे असा एकूण सुमारे एक लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपी कुख्यात
तपासादरम्यान आरोपी संजू मुकेश शर्मा याच्यावर हरियाणा राज्यातील रोहतक येथील पोलीस ठाण्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. तसेच आरोपी नितीन कुमार किसन कुमार याच्यावर हरियाणा राज्यातील रेल्वे पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असून, तो सन 2025 मध्ये सहा वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आल्याची माहिती आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, चेतन बोरसे, धर्मेंद्र मोहिते, हर्षल चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सुशील शेंडे तसेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे मनोज साठे व किरण साळवे आदींच्या पथकाने केली.






