जळगावात सिलिंडर स्फोटानंतर तीन घरांना आग
Three houses caught fire after cylinder explosion in Jalgaon जळगाव (15 फेब्रुवारी 2026) : शहरातील जुन्या जळगाव भागातील तरुण कुढापा चौक परिसरात रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने झाल्यानंतर आग लागल्याने या आगीत तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पीडित कुटुंबांचा संपूर्ण संसार डोळ्यांदेखत भस्मसात झाला.
अचानक झाला स्फोट
तरुण कुढापा चौक परिसरात निलेश शंकर शिरसाट आणि बापू शंकर शिरसाट यांची घरे आहेत. रविवार, 15 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाले आणि त्यानंतर गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळांनी आजूबाजूच्या घरांनाही कचाट्यात घेतले. दरम्यान लाकडाच्या पार्टीशनच्या घरे असल्याने तीनही घरांना भीषण आग लागली होती.

संसार आला उघड्यावर
या भीषण आगीत शिरसाट कुटुंबातील संसारोपयोगी वस्तू, कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. राहत्या घराची काही वेळातच राखरांगोळी झाल्याचे पाहून कुटुंबीयांना आपले अश्रू अनावर झाले होते. आगीची भीषणता पाहून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र आग आटोक्याबाहेर होती.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि आगीचे स्वरूप पाहता जवानांना सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पियुष कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि प्रशासकीय मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







