दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी : गटशिक्षणाधिकारी विजय पवार
Class 10 students should take exams with confidence: Group Education Officer Vijay Pawar पाचोरा (17 फेबु्रवारी 2026) : विद्यार्थ्यांनी गैर मार्गाचा अवलंब न करता आत्मविश्वासाने परीक्षा देवून यश मिळवावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले. शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा अंतर्गत 13 परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीची राज्य मंडळाची परीक्षा होणार आहे. चार हजार पाचशे पंचवीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. परीक्षा केंद्र संचालक व सहाय्यक परीरक्षक यांची सहविचार सभा पाचोरा गटशिक्षणाधिकारी तथा परीरक्षक विजय पवार यांनी आयोजित केली.
परीक्षा आयोजनाचा आढावा
गो.से.विद्यालयात झालेल्या या सभेत परीक्षा आयोजनाचा आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यासोबत प्रत्येक वर्गात झूम अॅपद्वारे संनियंत्रण करण्यात येणार आहे. तालुका नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असुन तेथून थेट केंद्रावर लक्ष ठेवणार असल्याचे तसेच परीक्षा सुरळीत होईल यासाठी नियोजन करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार म्हणाले.

भरारी व बैठे पथक असणार नियुक्त
पाचोरा तालुका स्तरावर दोन भरारी पथक आणि तेरा बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. महसूल विभागाचे स्वतंत्र बैठे पथक यावर्षी नेमण्यात आले आहे. सभेचे प्रास्ताविक भागवत कोरे यांनी तर आभार राजू सूर्यवंशी यांनी मानले. तहसीलदार विजय बनसोडे व गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे परीक्षा केंद्राना भेटी देतील. परीक्षा नियंत्रणकामी कैलास बडगुजर, दिलीप अहिरे, नितीन भालेराव, केंद्र प्रमुख अनिल पाटील, सीमा पाटील, जयदीप पाटील, सुनील शिवदे, गिरीश भोयर, सतीश पाटील, संजय पाटील इत्यादी कर्मचारी नियुक्त केले आहेत.







