भुसावळ बाजार समितीची ई-नामसाठी निवड : शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ
भुसावळ (18 फेब्रुवारी 2026) : शेतकर्यांच्या शेतमालाला रास्त दर मिळावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेअंतर्गत भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आली. राज्यस्तरीय मंजूर समितीच्या निर्णयानुसार बाजार समितीतील खरेदी-विक्रीची प्रक्रिया आता पूर्णपणे संगणकीकृत व ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
ई-नाम कार्यप्रणालीनुसार आवक गेट एन्ट्री, लॉट व्यवस्थापन, शेतमाल गुणवत्ता तपासणी (असेईंग), ई-लिलाव, वजन, विक्री करार,बिल निर्मिती,ऑनलाइन देयक तसेच जावक नोंद अशी सर्व कामे डिजिटल प्रणालीद्वारे पार पडतील. त्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक,जलद व सुरक्षित होतील. या योजनेमुळे देशातील 23 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे 1522 बाजार समित्यांशी भुसावळ बाजार समिती जोडली जाणार आहे. विविध कंपन्या व खरेदीदार ऑनलाइन लिलावात सहभागी होऊ शकतील. विक्रीची रक्कम थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने वेळेची बचत होईल. ई-नाम 2.0 पोर्टलवर शेतकरी व बाजार घटकांनी नोंदणी करावी, असे आवाहन सभापती अनिल वारके, उपसभापती शिवाजी पाटील व संचालक मंडळाने केले आहे. आ र कार्ड, बँक तपशील व संपर्क क्रमांकासह बाजार समिती कार्यालयात नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.








