2700 किलोमीटरचा प्रवास : जळगाव जिल्ह्यातून डिझेल लांबवणारी टोळी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
2700 kilometer journey : Gang smuggling diesel from Jalgaon district caught by Jalgaon Crime Branch जळगाव (18 फेब्रुवारी 2026) : डिझेल चोरी करून अपघाताचा बनाव रचणार्या एका आंतरराज्य टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईसाठी पथकाने तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास करत राजस्थानच्या वाळवंटातून मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत पोलिसांनी एक स्विफ्ट कार जप्त करीत एका आरोपीला अटक केली.
काय आहे नेमके प्रकरण ?
एरंडोल-पारोळा रोडवरील ‘हॉटेल आनंद’ परिसरात ही घटना 16 जानेवारी रोजी घडली होती. टँकर चालक भुराराम काळुराम याने आपल्या साथीदारांच्या मदतीने 22 लाख रुपये किमतीचे 30,000 लिटर डिझेल लंपास केले. चोरी लपवण्यासाठी त्यांनी टँकरचा अपघात झाल्याचा खोटा बनाव रचला होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

राजस्थानमधून आवळल्या मुसक्या
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे लोकेशन राजस्थानमधील बाडमेर येथे असल्याचे समजताच पीएसआय जितेंद्र वल्टे यांचे पथक रवाना झाले. बाडमेर येथील बलदेव नगरमध्ये पोलिसांची चाहुल लागताच मुख्य आरोपी भुराराम याने आपली स्विफ्ट कार (जी.जे.02 सी.जी.0339) सोडून पळ काढला. त्यानंतर पथकाने होड्डु या वाळवंटी भागातील घरांवर धाड टाकून अस्ला राम भोमाराम (32) याला शिताफीने अटक केली.
गुन्हेगारी कट आणि कडक कलमे
तपासात असे समोर आले की, हा केवळ चोरीचा प्रकार नसून पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला मोठा कट असल्याने आता या गुन्ह्यात गंभीर कलमे वाढवण्यात आली. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही यशस्वी कामगिरी पीएसआय जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी आणि तांत्रिक शाखेचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांच्या पथकाने बजावली.







