जळगावात तोतया पोलिसांनी वृद्धेकडील दिड लाखांचे दागिने लांबवले
Impersonation police in Jalgaon snatched jewellery worth Rs 1.5 lakh from an elderly man जळगाव (20 फेब्रुवारी 2026) : पोलिस असल्याचे भासवत तीन अज्ञात भामट्यांनी 65 वर्षीय वृद्ध महिलेला गंडवत तिच्याकडील एक लाख 56 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता घडली. याप्रकरणी गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
जळगाव शहरातील रामपेठ येथे कमलबाई एकनाथ सोनार (65) या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुने जळगाव भागातील भाग्यलक्ष्मी टेंट हाऊस जवळच्या चौकातून जात असताना यावेळी 30 ते 35 वयोगटातील तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. पोलिस असल्याचे सांगून या भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवले आणि विश्वास संपादन केला. तिघा भामट्यांनी हातचलाखी करून कमलबाई यांच्या जवळील सोन्याची चैन आणि सोन्याच्या बांगड्या असा एकूण एक लाख 56 हजारांचा ऐवज काढून घेत पळ काढला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कमलबाई यांनी शनीपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार गणेश नायकर करीत आहे.







