सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकासह कुटूंबाला महिनाभर डिजिटल अॅरेस्ट दाखवत लुटले एक कोटी 83 लाख
Retired bank manager and his family robbed of Rs 1 crore 83 lakh by showing them digital arrest for a month मुंबई (21 फेब्रुवारी 2026) : सायबर भामट्यांबाबत पोलिस प्रशासनाकडून वारंवार जनजागृती करूनही नागरिक फसव्या कॉलला बळी पडत असल्याचे चित्र आहे. डिजिटल अॅरेस्टच्या नावाखाली महिनाभर कुटूंबाला अटक दाखवत भामट्यांनी तब्बल एक कोटी 83 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना मुलूंडमधील निवृत्त बँक व्यवस्थापकासोबत घडली.
असे आहे फसवणूक प्रकरण
मुलुंड परिसरात पत्नी व मुलीसोबत राहणारे तक्रारदार 2020 मध्ये बँकेतून स्वेच्छानिवृत्त झाले. पत्नीही एलआयसीमधून निवृत्त तर मुलगी खाजगी नोकरीत आहे. 7 जानेवारी दुपारी सुमारास तक्रारदार यांच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. मी टेलिकॉम विभागातून बोलतेय. तुमच्या नावावर दुसरे सीमकार्ड घेण्यात आले आहे, असे सांगत तिने कॉल ‘वरिष्ठ अधिकार्याकडे’ जोडला. स्वतःला ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी’चा अधिकारी महेश कुमार म्हणवणार्या व्यक्तीने साळवींवर घाटकोपर पोलिसांत गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवली.
मनी लॉड्रींग घोटाळ्याची भीती
क्षणात कॉल गुन्हे शाखा आणि नंतर सीबीआय, दिल्ली येथे जोडल्याचे नाटक करण्यात आले. ‘आयपीएस अधिकारी’ म्हणून बोलणार्या व्यक्तीने सांगितले, तुम्ही कॅनरा बँकेचे खाते नरेश गोयललाला विकले आहे. त्या खात्यावरून दोन कोटींचा मनी लॉड्रिंग घोटाळा झाल्याचे सांगून जाळ्यात ओढले. व्हिडिओ कॉलवर सरकारी लोगो असलेली बनावट कागदपत्रे दाखवण्यात आली. ‘सुप्रीम कोर्टाचे गुप्त आदेश’ असल्याचे सांगून तक्रारदार जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच पत्नीला थेट व्हिडीओ कॉल करून याबाबत सांगितले.
एफडी मोडल्या… सोने गहाण
14 ते 31 जानेवारीदरम्यान आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे एकूण 1.83 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. यासाठी तक्रारदार यांनी मुदत ठेवी मोडल्या, सोने गहाण ठेवले तसेच शेअर्सही विकले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अखेर तक्रार दाखल
कुटुंबीयांना एका खोलीत बसवून दर दोन तासांनी रिपोर्ट देण्यास भाग पाडले गेले. कोणालाही सांगितले तर अटक आणि जीव धोक्यात येईल, अशा धमक्यांनी कुटुंब भयभीत झाले. आरोपींनी त्यांच्या मालमत्तेची, बँक खात्यांची माहिती घेतली. 14 ते 31 जानेवारीदरम्यान आरटीजीएसद्वारे विविध खात्यांत 1.83 कोटी वर्ग केले. अचानक 11 फेब्रुवारीनंतर संपर्क तुटला व सत्य उघड झाले. आरोपींच्या जाळ्यातून बाहेर येताच तक्रारदार यांनी 18 फेब्रुवारी रोजी 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदविली.







