जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : दारु दुकान फोडणार्या कल्याणच्या चोरट्याला बेड्या
Jalgaon Crime Branch’s performance: Kalyan thief who broke into a liquor shop arrested जळगाव (21 फेब्रुवारी 2026) : जळगाव शहरातील दोन वाईन शॉप फोडून लाखोंची रोकड लंपास करणार्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत अटक केली. आरोपीकडून मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. रामनिवास मंजू गुप्ता (37, रा.रामनगर, कल्याण, जि.ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय घडले जळगावात ?
गुरुवार, 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भजे गल्लीतील ‘प्रिन्स वाईन शॉप’चे शटर तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील दोन लाख 50 हजार रुपयांची रोकड लांबवली होती शिवाय याच दिवशी रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अजिंठा चौफुली परिसरातील ‘राज वाईन्स’चे शटर तोडून सुमारे एक लाख 25 हजार रुपये चोरून नेण्यात आले याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी जाळ्यात
एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या अवघ्या 12 तासांत रामनिवास मंजू गुप्ता (37, रा.रामनगर, कल्याण, जि. ठाणे) याला ताब्यात घेतले.
मुद्देमाल व दुचाकी जप्त
आरोपीकडून सुमारे तीन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली बजाज अॅव्हेंजर मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली. चौकशीत आरोपीने दोन्ही वाईन शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. तो मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर तसेच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सानपाडा, नेरुळ, काशिमीरा, नालासोपारा, कोरेगाव पार्क यांसह विविध ठिकाणी त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, प्रशांत परदेशी तसेच नेत्रम विभागातील मुबारक देशमुख आदींनी केली.







