जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार : चौकशी समितीसाठी दिली मृत शिक्षकांची नावे
भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. चौकशीकामी चक्क मृत शिक्षकांची नावे देण्यात आल्याने कारवाईची मागणी भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण ?
माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित किंवा कायमचे काढून टाकण्यासाठी 1981 च्या शिक्षण कायद्यातील नियम 36व 37 नुसार कारवाई करावी लागते त्यासाठी नियुक्त करायच्या चौकशी समितीत एक राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार प्राप्त सदस्य असणे बंधनकारक आहे आणि अशी यादी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत स्वरूपात तयार ठेवून मागणी केलेल्या शिक्षण संस्थेला द्यायची असते. या यादीत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, फोन नंबर, पुरस्कार कधी मिळाला ते वर्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी चौकशी समितीत काम करायला तयार आहे असे त्यांचे संमती पत्र ही फाईलमध्ये असावे लागते.
नुकतेच एका शिक्षण संस्थेने त्यांच्या शाळेतील कर्मचार्याविरुद्ध चौकशी समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यांनी शिक्षणाधिकारी यांचेकडे राष्ट्रीय/ राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी मागितली मात्र काय आश्चर्य शिक्षणाधिकार्यांनी चक्क मृत व्यक्तींचीही नावे संस्थेला कळवली! आता बिचार्या संस्था चालकांनी यादीतील नावांपैकी एक दोघांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण उत्तर नाही मग अधिक चौकशी करता त्या व्यक्ती तर अनेक वर्षांपूर्वीच मृत झाल्याचे समोर आले.
आता प्रश्न असा आहे की, शिक्षणाधिकार्यांनी अशी यादी केलीच कशी? ही फक्त यादी नसते तर अद्ययावत यादी असते आणि त्या व्यक्तीचे संमतीपत्रही असते मग शिक्षणाधिकार्यांनी स्वर्गात जाऊन त्याचं नाव आणि संमती पत्र मिळवले की काय!! डिजिटल क्रांतीच्या युगातील आमच्या शिक्षण विभागाचा कारभार किती भोंगळ, अन् बेजबाबदारपणाचा म्हणावा ! बरं यादीत एखाद दुसरा मृत व्यक्ती चुकून राहिला असं म्हणावं तर तेही शक्य नाही कारण दिलेल्या यादीतील निम्मे किंवा त्याहीपेक्षा कदाचित अधिक व्यक्ती अनेक वर्षांपासून मृत आहेत!
जनतेला, निर्दोष, अद्ययावत व त्वरित सेवा देणे हे आपले नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य असून त्याचसाठी आपणास जनतेच्याच पैशातून दरमहा लाख पगार मिळतो याचे तरी किमान भान ठेवावे, असे दलाल यांनी कळवले आहे.







