चाळीसगावात दुचाकीस्वाराला चावा घेत महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली : धाडसानंतर एका चोरट्याला पकडण्यात यश
A woman was bitten by a biker in Chalisgaon and her throat was cut open: After a daring attempt, a thief was caught. चाळीसगाव (22 फेब्रुवारी 2026) : दुचाकीवरून दाम्पत्य जात असताना त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी दुचाकीस्वाराच्या हाताला चावा घेतला व दुचाकीस्वाराच्या पत्नीच्या गळ्यातील एक लाख पाच हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. दुचाकीस्वाराने धाडस दाखवत एका भामट्यास पकडून ठेवले मात्र अन्य दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. अटकेतील संशयीतासह पसार संशयीत हे अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील आहेत. ही घटना चाळीसगाव शहरातील कॉलेज ग्राऊंडजवळील हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
काय घडले चाळीसगावात ?
वसंत शंकर पवार (रा.पारीजात नगर, शुक्लाविहीरजवळ, धुळे रोड चाळीसगाव) हे 20 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पत्नी सोनल पवार यांच्यासह दुचाकीने शहरातील कॉलेज ग्राऊंडजवळील हनुमान मंदिराकडून करगाव रस्त्याने जात असतांना काळ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली एक एफझेड यामाहवर तिघे आले. यावेळी एकाने वसंत पवार यांच्या हाताला चावा घेवून दुखापत केली. त्याचवेळी एकाने पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील एक लाख पाच हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावली. यावेळी भामट्यांनी वसंत पवार यांच्या हाताला चावा घेत असतांना तशा स्थितीतही एका भामट्यास त्यांनी घट्ट पकडून ठेवले मात्र दोघे जण सोन्याची पोत हिसकावून पळून जाण्यास यशस्वी ठरले.
चोर्या उघडकीस येण्याची शक्यता
पकडून ठेवलेल्या इसमाचे नाव महेश बाळासाहेब जाधव असे आहे तर पसार संशयीत मानेरी, ता.राहुरी, जि.अहिल्यादेवीनगर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी महेश जाधव यास ताब्यात घेतले. या प्रकरणी वसंत शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश बाळासाहेब जाधव (रा.मानोरी, ता.राहुरी, जि.अहिल्यादेवीनगर) याच्यासह दुचाकीवरील दोन अज्ञात इसम अशा तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, एपीआय शंकर मुटेकर यांनी भेट दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर हे करीत आहेत.