माणसाने देवाची भक्ती करण्यापूर्वी घरातील माणसांनाही जपले पाहिजे
किर्तन महाेत्सव : भुसावळच्या पद्मावतीनगरात राधाताई भाेलाणेकर यांचा संदेश
भुसावळ (22 फेब्रुवारी 2026) : भक्तीसाठी मोठे सोहळे करण्याची गरज नाही; तर अंतःकरण शुद्ध ठेवून केलेली साधी भक्तीही ईश्वरापर्यंत पोहोचते. माणसाने भक्ती करण्यापूर्वी आपल्या घरातील माणसांना जपले पाहिजे. ज्या घरात सासू-सून, पती-पत्नी आणि माय-लेकींचे संबंध सलोख्याचे आहेत, तिथेच देवाचा अधिवास असतो असे मत किर्तनकार राधाताई पाटील (भाेलाणे, जि. धुळे) यांनी केले.
भुसावळच्या वरणगाव राेडवरील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावतीनगरात आयाेजित तीन दिवसीय किर्तन महाेत्सवात त्या बाेलत हाेत्या. बिजासनी मातेच्या प्राणप्रतिष्ठा साेहळा निमित्ताने हा कार्यक्रम सुरू आहे. पांडुरंग ओंकार पाटील, अलका पांडुरंग पाटील, पवन पाटील व आप्तेष्टांच्या वतीने या महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले. किर्तन महाेत्सवाला राजेंद्र महाराज कासाेदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. गायनाचार्य रामकृष्ण महाराज यांनी लय, ताल आणि सुरात भजने सादर केली. मृदंगाचार्य हर्षल महाराज यांनी मृदंगाच्या तालावर रसिकांना ठेका धरायला लावला. राधाताई महाराज भाेलाणेकर यांच्या कीर्तनाचा मुख्य रोख हा घरातील नातेसंबंध सुधारण्यावर हाेता. त्या म्हणाल्या की, घरातील कलह टाळून सासू आणि सुनेने गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. त्यासाठी माेबाइल, मनाेरंजन वाहिन्यांच्या मायाजालापासून लांब रहावे. कुटुंबात सुसंवाद महत्त्वाचा आहे. लेकीचा संसार सुखी व समाधानाचे सुरू ठेवायचा असेल तर आईने ढवळाढवळ करू नये. पती-पत्नीचे संबंध मधूर ठेवण्यासाठी एकमेकांचा आदर आणि विश्वास महत्त्वाचा आहे. स्त्रियांनी केवळ अंधश्रद्धेच्या मागे न लागता, आपल्या कुटुंबाचा आधार बनावे. मुलांवर संस्कार करणे आणि घराला घरपण देणे ही स्त्रीची मुख्य जबाबदारी आहे. व्यसन हे केवळ माणसालाच नाही तर संपूर्ण पिढीला उद्ध्वस्त करते. त्यामुळे व्यसन सोडा आणि विठ्ठल नामाची ओढ धरा. तरुण पिढीने संयम आणि मर्यादेत राहून आपले जीवन व्यतीत करावे.
नातेसंबंधांवर मार्मिक भाष्य
कीर्तनाच्या प्रारंभी राधाताईंनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण केले. आजच्या धावपळीच्या युगात माणूस विठ्ठलाच्या भक्तीपेक्षा भौतिक सुखाच्या मागे कसा धावत आहे, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. विशेषतः सासू-सून या नात्यावर भाष्य करताना त्यांनी उपस्थित महिला वर्गाची मने जिंकली. सून ही मुलगी म्हणून आणि सासू ही आई म्हणून घरात वागली, तर त्या घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही, असे त्यांनी सांगताच सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला.
व्यसनमुक्तीचा कडक संदेश
राधाताईंनी आपल्या कीर्तनातून समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेवर कडक शब्दांत प्रहार केला. दारू आणि इतर व्यसनांमुळे हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पुरुषांनी आपल्या कमाईचा हिस्सा व्यसनावर न घालवता मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा. आपला मुलगा आणि मुलीचे मित्र व मैत्रिणी काेण आहेत हे पालकांनी निरखून पाहणे गरजेचे आहे. जेथे किर्तनाची जागा तेथे पांडुरंगाचे दर्शन हाेते. म्हणून मुला-बाळांना किर्तनाचा लळा लावण्याची जबाबदारी पालकांची आहे.
आई-वडीलांची सेवा करा
जन्मदाते आई-वडील हयात आहेत ताेपर्यंत त्याची निकाेप भावनेतून सेवा करा. त्यांच्या सेवेतून तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी घराघरात संत ज्ञानेश्वरी, गीता, संत साहित्याचे अध्ययन झाले पाहिजे. धर्मग्रंथांच्या केवळ दर्शनानेही मनाला उभारी मिळते. मैत्रीभाव असा जाेपासा की संकटाच्या काळात मदत झाली पाहिजे. जीवनात पैसे जाेडण्यापेक्षा माणसं जाेडा. निकाेप प्रेमाची व्याख्या समजून घ्या. व्यभीचारी जीवन जगू नका असेही राधाताई यांनी नमूद केले.
शैली आणि सादरीकरण
कठीण आणि गंभीर विषय राधाताई विनोदाच्या माध्यमातून मांडतात, ज्यामुळे त्यांचे कीर्तन सामान्य माणसाला आणि विशेषतः महिला वर्गाला खूप जवळचे वाटते. त्यांच्या कीर्तनात अस्सल ग्रामीण भाषेचा लहेजा असतो, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रेक्षकांशी त्यांचा संवाद सहज साधला जातो. नवरा-बायकोचे छोटे-मोठे किस्से सांगून त्या विषयाची पकड घट्ट करतात. त्यांचे कीर्तन क्लिष्ट तत्त्वज्ञानात अडकलेले नसते. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आधार घेऊन त्या मांडणी करतात.