क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या नावाखाली अमळनेरच्या ज्येष्ठ डॉक्टरांना एक कोटी 65 लाखांचा गंडा
जळगाव (22 फेब्रुवारी 2026) : क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून अमळनेर येथील एका 70 वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरची तब्बल एक कोटी 65 लाख 57 हजार 204 रुपयात ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
अमळनेरच्या यशवंत नगरातील रहिवासी असलेले 70 वर्षीय डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांना झासी प्रवीण पाटील नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने शिंदे यांचा विश्वास संपादन करून त्यांना ‘क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तिने शिंदे यांना लिंक पाठवून संबंधित नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
सुरुवातीला डॉक्टर शिंदे यांनी 70 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यावर त्यांना चक्क एक लाख 53 हजार 21 रुपयांचा नफा दाखवण्यात आला. हा परतावा मिळाल्याने शिंदे यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्यांना अधिक गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. 29 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या अवघ्या 21 दिवसांच्या कालावधीत डॉक्टर शिंदे यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण एक कोटी 65 हजार 57 हजार 204 रुपये गुंतवले मात्र एव्हढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठले.
डॉ.शिंदे यांच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात झासी प्रवीण पाटील, तिचे साथीदार, प्लिकेशन चालवणारे आणि संबंधित बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.