पाचोरा पोलिसांची कामगिरी : खिसे कापू महिलांची टोळी जाळ्यात
पाचोरा (25 फेब्रुवारी 2026) : पाचोरा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापणार्या महिलांच्या टोळीला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिलांकडून 32 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरीनंतर पोलिसांची कारवाई
वडगांव खुर्द येथील 70 वर्षीय श्रावण ताराचंद पाटील हे नोव्हेंबरमध्ये पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून 13 हजार 400 रुपये लांबवले. याबाबत पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 23 फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील, श्रीराम शिंपी आदींंनी बसस्थानक परिसरातून तीन संशयीत महिलांना ताब्यात घेतले.

पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी त्यांची चौकशी केली असता या महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांमध्ये निर्मला सुनील जोशी (33, रा.गंगापुरी, जामनेर), सोनाली गणेश विधाते (24, रा.हिसोडा खुर्द, जालना, हल्ली मुक्काम कुंभारी, जामनेर), उषाबाई तेजराव (55, रा.कुंभारी, जामनेर) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, राहुल शिंपी, अशोक हटकर, शरद पाटील, श्रीराम शिंपी, प्रियंका आहेर तसेच होमगार्ड सोनाली शशिकांत पाटील, कल्पना तानाजी निंबाळकर, संगीता मुरलीधर पाटील आदींच्या पथकाने केली.