एस.टी.बससह विद्यार्थ्यांना नेणार्‍या वाहनात अपघात : यावल तालुक्यातील सहा विद्यार्थी जखमी


Accident in vehicle carrying students including ST bus : Six students from Yaval taluka injured यावल (1 मार्च 2026) : यावल तालुक्यात टाकरखेडा गावाजवळ भालशिव फाट्यावरील वळणावर अचानक पिंप्री गावातून स्कुलचे विद्यार्थी घेवून जाणारे वाहन एस.टी. बसच्या समोर आले. एसटी बस चालकाने समय सुचकता दाखवत एस.टी.बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र तरी देखील दोन्ही वाहन आपसात धडकल्याने सहा विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या वाहनावरील चालक असे सात जण जखमी झाले. जखमींवर यावल रुग्णालयात प्रथमोपचार करीत फैजपूर येथील खाचणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

शाळा प्रशासनाची धाव
अपघाताची माहिती मिळताच मॉडर्न स्कुलच्या अध्यक्ष, मुख्याध्यापिका यांनी रुग्णालयात जात विद्यार्थ्यांची पाहणी केली. पिंप्री, ता.यावल येथील जगदीश सपकाळे हे शनिवारी सकाळी वाहन (क्रमांक एम.एच.37 जी. 6680) व्दारे गावातील विद्यार्थी घेवून यावल येथे येत होते. दरम्यान टाकरखेडा गावाजवळील भालशिव फाट्याच्या वळणावर समोरून यावल-टाकरखेडा एस.टी.बस (क्रमांक एम.एच.40 एन.9845) घेवून चालक एस.एम.पाटील येत होते. अचानक बस समोर वळणावर विद्यार्थ्यांचे वाहन आल्याने बस चालकाने समयसुचकता दाखवत तातडीने बसवर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टळली.



सहा विद्याार्थी जखमी
दोन्ही वाहन आपसात धडकल्याने या अपघातामध्ये स्कूलचे विद्यार्थी नेणार्‍या वाहनावरील चालक जगदीश सपकाळे त्याचप्रमाणे विद्यार्थी वेदांत निलेश सपकाळे (5), लक्ष्मी गणेश सपकाळे (7), दक्ष रमेश सपकाळे (5), राधिका राहुल सपकाळे (5) व गायत्री समाधान सपकाळे (3) हे विद्यार्थी जखमी झाले. जखमींना पिंप्रीचे पोलीस पाटील दिनकर कोळी, भालशिवचे पोलीस पाटील सचिन तायडे तसेच बंटी धनगर यांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथून प्रथमोपचार करून त्या सर्वांना फैजपूरातील खाचणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच यावल येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या अध्यक्ष नीता गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. सद्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !