भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने धनवाडीतील दुचाकीस्वार ठार
A biker in Dhanwadi was killed after being hit by a speeding tractor. चोपडा (2 फेब्रुवारी 2026) : विना क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या भीषण धडकेत धनवाडीतील 54 वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. नंदकिशोर देवसिंग चौधरी (वय 54, रा. धनवाडी, ता. चोपडा) असे मृताचे नाव असून सहदुचाकी चालकही जखमी झाला आहे. चोपडा तालुक्यातील धनवाडी ते गरताड रस्त्यावर हा अपघात घडला.
असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, बन्सीलाल काळू पाटील यांच्या शेताजवळ मयत नंदकिशोर चौधरी हे त्यांच्या बजाज प्लॅटिना मोटारसायकलने (क्र. एम.एच.19 डी.एल.0990) हे फिर्यादी सुभाष रुपसिंग चौधरी यांना मागे बसवून शेतातून घराकडे जात होते.


त्याच वेळी समोरून येणार्या निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत वेगात आणि हयगयीने चालवून दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नंदकिशोर चौधरी यांचा गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अपघात प्रकरणी सुभाष रुपसिंग चौधरी यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.







