राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : उनपदेव शिवारातून 81 हजारांचा मद्यसाठा जप्त
Major action by the State Excise Department : Liquor worth Rs 81,000 seized from Unapdev Shivara चोपडा (3 मार्च 2026) : अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. उनपदेव शिवारातून वाहनासह तब्बल सात लाख 81 हजार 010 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. होळी व भोंगरीया सणांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने अवैधरित्या मद्याची साठवणूक करुन विक्री करणार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान भूषण सुभाष परदेशी यांना उनपदेव-वर्डी मार्गावर मध्य प्रदेश निर्मित अवैध मद्याची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवार, 2 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला. महेंद्रा बोलेरो पिकअप (एम.पी.46 झेड.डी.8454) मधून मद्यविक्री सुरू असताना पथकाने अचानक धाड टाकत वाहनाची झडती घेतली आणि अवैध मद्यसाठा जप्त केला.



आठ लाखांचा मद्यसाठा जप्त
या कारवाईदरम्यान माउंट 6000 स्ट्राँग बिअरच्या 366 बाटल्या (किंमत 42 हजार 90 रुपये), टँगो पंच या बनावट देशी दारूच्या 535 बाटल्या (किंमत 32 हजार 320 रुपये) आणि रॉयल स्टॅगच्या 24 बाटल्या (किंमत सहा हजार रुपये) असा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय सुमारे 7 लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप आणि दोन प्लास्टिक टबही जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत 7 लाख 81 हजार 010 रुपये इतकी असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विठ्ठल टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव भरारी पथकाचे निरीक्षक अशोक पी. तारू, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी, जवान नरेंद्र पाटील, राहुल सोनवणे व महिला जवान पुनम पाटील यांनी केली. चोपडा विभागाचे निरीक्षक अब्दुल कैय्युम सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक निकिता खपके, जवान विपुल राजपूत, भूषण परदेशी, कुणाल सोनावणे, नितीन पाटील आणि दिनेश पाटील यांचाही पथकात समावेश होता. या प्रकरणी अत्तरसिंग मांगिलाल बारेला (27) आणि विकास बिरसिंग बारेला (29, रा.मुळया उतार, ता.चोपडा) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आल. तपास निरीक्षक ए.के.सु.मोमीन करीत आहेत.







