शिरपूर पोलिसांची सतर्कता : दरोडा टाकून पसार झालेल्या दौंडच्या दरोडेखोरांना अटक
Shirpur police alert: Daund robbers who fled after robbery arrested शिरपूर (3 मार्च 2026) : सेंधव्यातील अगरबत्ती व सुगंधी द्रव्याच्या कारखान्यात भल्या पहाटे धुमाकूळ घालून दरोडा टाकणार्या दौंडच्या टोळीला शिरपूर पोलिसांनी समन्वय व ग्रामस्थांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन्ही वाहनांसह 19 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सेंधव्या दरोडा, शिरपूरात सतर्कता
सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीजमध्ये मंगळवार. 3 रोजी पहाटे तीन ते चार दरम्यान पाच ते दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत पाच मजुरांना मारहाण करीत एक लाखांची रोकड, तीन मोबाईल, ग्रे रंगाची सियाझ कार (एम.पी.13 झेड.आर. 8510) लांबवली. आरोपी गुन्हा करण्यासाठी लाल रंगाची मारुती स्वीप्ट घेवून आल्याने दरोड्याचे इत्यंभूत वर्णन सेंधवा प्रभारींनी धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाला कळवले. दोन्ही वाहनांसह आरोपी शिरपूरच्या दिशेने येत असल्याने नाकाबंदी लावण्यात आली.



एक आरोपी आधी अडकला
शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे व शिरपूर शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी बोराडी गाव, वाघाडी टी-पॉईंट व शिरपूर टोल नाका येथे नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान आरोपी फिरोज कचरु सैयद (रा. कासुर्डी, ता. दौंड, जि.पुणे) याला चोरी केलेल्या सियाज कारसह पकडण्यात शिरपूर तालुका पोलिसांनी यश आले मात्र अन्य साथीदार लाल रंगाच्या स्विफ्ट कारने पसार झाले.
आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग
वाघाडी टी-पॉईंटवर पोलिसांची नाकाबंदी पाहताच आरोपींनी भरधाव वेगाने वाहन पळवण्यास सुरुवात केली. करवंद नाका, गुजराती कॉम्प्लेक्स, अमोदे, शिरपूर फाटा, चोपडा फाटा, थाळनेर, मांजरोद, कुरखळीमार्गे आरोपी पळत असताना त्यांनी सावळदे गावाजवळ तापी नदी किनारी लाल रंगाची स्विफ्ट कार सोडून नदीकाठाने पळ सुरू केला मात्र पोलिसांनी गावागावांत आधीच सतर्कता संदेश दिल्याने ग्रामस्थांच्या मदतीने चार आरोपींना पकडण्यात यश आले. याकामी सावळदे, कुरखळी दहिवद व परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना मोलाची मदत केली.
या आरोपींना अटक
पोलिसांनी विशाल अनिल दामोदरे (26, वरवंड, ता.दौंड), रमेश बापू करडे (52, केळगाव, ता.दौंड), श्याम तानाजी साळुंखे (29, हडपसर, पुणे), संतोष आण्णा शिवरकर (30, बोरीपारधी, ता.दौंड) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून लाल रंगाची स्वीप्ट (एम.एच.12 यु.सी.03202), पाच लाखांची रोकड, तीन मोबाईल फोन, सुगंधी तेलाचे चार ड्रम , आडजातीची लाकडे, सियाझ कार मिळून 19 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, रवींद्र अखडमल, राजेंद्र रोकडे, योगेश दाभाडे, गोविंद कोळीश्री. विनोद अखडमल, भटू साळुंखे, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, प्रशांत मनोज दाभाडे, मनोज महाजन, शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल लक्ष्मण हिरे, अल्ताफ बेग अस्मान बेग मिर्झा, संजय आसाराम चव्हाण, वाला पुरोहित, मनोज नेरकर, होमगार्ड दीपक बच्छाव आदींच्या पथकाने केली.







