चाळीसगाव तालुक्यातील सरपंचासह उरसरपंचांना ठार मारण्याचा बनाव उघड : चार आरोपींना अटक
Plot to kill Sarpanch and Ursarpanch in Chalisgaon taluka exposed: Four accused arrested चाळीसगाव (5 मार्च 2026) :चाळीसगाव तालुक्यातील दस्केवडी येथील सरपंच आणि उपसरपंच यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव रचणार्या चार आरोपींना मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला साधा रस्ता अपघात वाटणार्या या प्रकरणामागे राजकीय वैमनस्यातून आखलेला कट असल्याचे निष्पन्न झाले असून गुन्ह्यातील पिकअप वाहन जप्त करण्यात आले.
काय आहे नेमके प्रकरण ?
मेहुणबारे पोलीस ठाण्यात 25 फेब्रुवारी 2026 रोजी दस्केवडी उपसरपंच ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे यांच्या तक्रारीवरून रस्ता अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी व दस्केबर्डी सरपंच ईश्वर अहिरे आणि भगवान उत्तम देवरे हे 26 जानेवारी 2026 रोजी रात्री चाळीसगावहून दस्केवडीकडे बुलेट मोटारसायकलने जात असताना शिदवाडी शिवारात मेहुणबारे-शिवबाडी रस्त्यावर समोरून येणार्या पिकअप वाहनाने त्यांना जोराची धडक दिली होती. या अपघातात दोघेही खाली पडले आणि सरपंच भगवान देवरे गंभीर जखमी झाले मात्र हा साधा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला होता.






पोलिसांनी केली चौकशी
फिर्यादींच्या संशयानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासाला वेग दिला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पिकअप वाहनाचा शोध घेतला.
तपासादरम्यान पिकअप वाहन आणि त्याचा मालक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. दस्केवडी गावातील राजकीय मतभेदांमुळे काही आरोपींनी कट रचून अपघाताचा बनाव तयार केला होता. या कटात भीमराव पांडुरंग रोकडे, सचिन भीमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी आणि लक्ष्मण अशोक महाजन (रा. वाडे, ता.भडगाव – पिकअप वाहन मालक) यांनी संगनमताने सरपंच भगवान देवरे आणि उपसरपंच ईश्वर अहिरे यांना समोरून पिकअप वाहनाने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या घटनेनंतर सुरुवातीला दाखल केलेल्या अपघाताच्या कलमांमध्ये बदल करून आरोपींविरुद्ध फौजदारी कट रचणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर कलमे लावण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक केली व गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आले
यांनी केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस हवालदार किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, पोलीस नाईक योगेश पाटील तसेच पोलीस कर्मचारी विनोद बेलदार आणि संजय लाटे यांनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, कर्मचारी संजय लाटे करीत आहेत.







