विरुद्ध दिशेने येणार्या कारच्या धडकेने पाच मजूर जखमी : दोन क्रमांक असलेली अपघातग्रस्त कार भुसावळची !
Five laborers injured after being hit by a car coming from the opposite direction: The car with number two in the accident is from Bhusawal! भुसावळ (12 मार्च 2026) : रस्त्याने पायी कामासाठी निघालेल्या पाच मजुरांना भुसावळातील इर्टीका कारने जबर धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील मुक्ताईनगर हरताळा फाट्याजवळील उड्डाण पुलाखाली गुरुवारी सकाळी घडली. या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली तर पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अपघाताला कारणीभूत असलेली कार भुसावळातील रहिवासी विनय सहस्त्रबुद्धे यांची असून या प्रकरणात त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विरुद्ध दिशेने येत असलेल्या भरधाव अर्टीगा कारवरील नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्याने पायी चालणार्या पाच मजुरांना धडक दिली. या अपघातात प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी व ज्ञानेश्वर कोळी हे गंभीर जखमी झाले.




अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. हरताळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनीही लगेच मदतीसाठी पुढाकार घेतला. गावकर्यांच्या मदतीने जखमींना कारमधून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तत्काळ जवळच्या मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उत्तम उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांची काठी व दोन नंबर प्लेट
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारला दोन नंबर प्लेट लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या कारमधून पोलिस वापरतात ती फायबरची काठीदेखील जप्त करण्यात आली आहे. भुसावळातील सहस्त्रबुद्धे नामक व्यक्तीची कार असून त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ या प्रकरणात स्वतः चौकशी करीत असल्याने लवकरच या प्रकारात धक्कादायक खुलासा समोर येण्याची शक्यता आहे.