सातपुड्यात मनुदेवी कक्षात वनवा लावणार्याला अटक
Person Arrested for Setting Forest Fire in Satpura’s Manudevi Range यावल (17 मार्च 2026) : यावल तालुक्यातील पश्चिम भागात वाघझिरा परिमंडळात मनुदेवी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 149 मध्ये एकाने वनवा पेटवत वनक्षेत्राला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार निदर्शनास येताच वनविभागाकडून एकाला अटक करण्यात आली आहे. यावल न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची वन कोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण?
प्रादेशिक वन विभाग पश्चिम अंतर्गत वाघझिरा राऊंड अर्थात परिमंडळ आहे. या परिमंडळातील नियत क्षेत्र मनुदेवी मधील कक्ष क्रमांक 149 मध्ये रविवारी वनवा पेटवताना राज्या सखाराम बारेला (रा. झेंडी पाडा, ता.यावल) हा वन विभागाच्या पथकाला गस्तीदरम्यान आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीला सोमवारी यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश र.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता त्याला बुधवार, 18 मार्च तीन दिवसाची वन कोठडी सुनवण्यात आली आहे.




ही कारवाई यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक सौरीष सहाय, उपवनसरंक्षक समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी विपुल पाटील, हनुमंत सोनवणे, अशोक राठोड, चेतन शेलार, जगदीश बारेला आदींनी केली. यावेळी पेटवलेला वनवा विझवण्यात आला.