38 लाखांच्या गांजासह त्रिकूट शिरपूर तालुका पोलिसांच्या जाळ्यात
हॉटेल्ससह ढाब्यांवर अंमली पदार्थ विकणार्यांच्या गोटात कारवाईने खळबळ
Trio Caught by Shirpur Taluka Police with Ganja Worth ₹38 Lakhs शिरपूर (19 मार्च 2026) : शिरपूर तालुक्यातील हॉटेल्ससह ढाब्यांवर मानवी मेंदूवर परिणाम करणार्या गांजासह दोडा आदी अफूजन्य पदार्थांची विक्री करून साठा करणार्या त्रिकूटाला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 37 लाख 45 हजार 965 रुपये किंमतीचा 224.699 किलो गांजा, डोडा व अफूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान, अंमली पदार्थ विक्रीच्या माध्यमातून मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा यंत्रणेला संशय आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई : त्रिकूट जाळ्यात
शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 लगत पळासनेर परिसरातील काही हॉटेल व ढाब्यांवर अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवार, 18 रोजी चार टीम तयार करीत छापेमारी केली. यावेळी जय बाबारी हॉटेलमधून संशयीत भला सोडा भरवाड, जय माता दी ढाबा अॅण्ड रेस्टारंटमधून गोपाळ रघू भरवाड तर श्री रामदेव बाबा हॉटेलमधून लाला गांगू भरवाडे (तिघे रा.चारणपाडा, ता.पळासनेर, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 224.699 किलो वजनाचा व 37 लाख 45 हजार 965 रुपये किंमतीचा गांजाचा चुरा, सुकलेला गांजा अफूची पावडर (डोडा), अफूच्या सुकलेल्या बोंडांचे तुकडे जप्त करण्यात आले. शेखर बागुल यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, मनोज कचरे, मिलिंद पवार, शेखर बागुल, राजू ढिसले, संदीप ठाकरे, सुनील पाठक, अनिल चौधरी, कृष्णा पावरा, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, विजय ढिवरे बडगुजर, शिवाजी वसावे, जयेश मोरे, अल्ताफ मिर्झा, इसार फारुकी आदींच्या पथकाने केली.