भुसावळात घरगुती सिलिंडरचा व्यावसायीक वापर : पुरवठा विभागाच्या कारवाईत हॉटेल्समधून 12 सिलिंडर जप्त
Commercial Use of Domestic Cylinders in Bhusawal : Supply Department Seizes 12 Cylinders from Hotels During Operation भुसावळ (19 मार्च 2026) : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धामुळे गॅस टंचाईचा भडका उडाला असतानाच सर्वसामान्य सिलिंडरसाठी ताटकळत असताना शहरातील हॉटेल्ससह ढाबे व खाजगी विक्रेत्यांकडून घरगुती सिलिंडर व्यावसायीक कामासाठी वापरले जात असताना जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने स्थानिक पुरवठा विभागाने तब्बल 19 ठिकाणी छापेमारी करीत 12 सिलिंडर जप्त केल्याने व्यावसायीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
12 सिलिंडर जप्त : गुन्हा दाखल होणार
घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत असल्याच्या संशयावरून पुरवठा विभागाने भुसावळ शहरातील 19 हॉटेल्समध्ये अचानक तपासणी केली. यात एकूण 12 ठिकाणी घरगुती वापराचे गॅस सिलिंडर मिळाले, पंचनामा करून हे सिलिंडर जप्त करण्यात आले. शहरातील हॉटेल्स, हातगाडीवर खाद्यपदार्थ बनवून विक्री करणार्यांकडे दररोज अचानक तपासणी होईल, अशी माहिती तहसीलदार निता लबडे यांनी दिली.


या ठिकाणी झाली कारवाई
शहरातील हॉटेल गोपाळमधून चार, गुरुकृपा भरीत सेंटर येथे दोन, डंबेलकर चहा येथे, सुहास हॉटेलमध्ये दोन हॉटेलख, युवा प्रतिष्ठानमधून दोन तर तवक्कल हॉटेलमधून एक असे 12 सिलिंडर जप्त करण्यात आले.
तर परवानाही होईल रद्द
घरगुती गॅसचा व्यावसायीक वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून यामुळे घरगुती ग्राहकांच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. यापुढेही अशा प्रकारची तपासणी मोहीम सातत्याने राबवण्यात येईल. सर्व हॉटेल आणि व्यावसायिक चालकांनी केवळ व्यावसायीक निळ्या रंगाच्या सिलिंडरचाच वापर करावा, अन्यथा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार निता लबडे यांनी दिला आहे.