भोंदू बाबा अशोक खरातने अटक करणार्‍या पोलिसांनाच दिला देवाचा कोप होण्याचा शाप !


Fraudster ‘Baba’ Ashok Kharat Curses Arresting Police with Divine Wrath! नाशिक (21 मार्च 2026) : राज्यात गाजत असलेल्या नाशिकच्या विवाहितेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी तथा भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन किस्से समोर येत आहेत. त्यातच पोलिसांनी एखाद्या सिनेमाला शोभेल अशी गुप्तता पाळत आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर अशोक खरातने त्याला अटक करणार्‍या पोलिसांना देवाचा कोप होण्याचा शाप दिल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी पाळली गुप्तता
अशोक खरातला गत बुधवारी अटक झाली. आता त्याच्या अटकेची इनसाईड स्टोरी पुढे आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरातला अटक करण्यासाठी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. ही संपूर्ण कारवाई एवढी गोपनीय होती की, त्यात सहभागी असलेल्या पथकातील कर्मचार्‍यांनाही आपण कुणाला पकडण्यासाठी जात आहोत? याचा थांगपत्ता नव्हता. कायदा सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती. या पथकातील पोलिसांकडे स्वतःच्या सुरक्षेसाठी काठी व हेल्मेट देण्यात आले होते.


लूकआऊट नोटीसीने परदेशात जाता आले नाही
अशोक खरातलाही स्वतःच्या अटकेची कुणकुण लागल्याने त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी देण्याची पोलिसांची तयारी नव्हती. सूत्रांच्या मते, भोंदू खरात परदेशात पलायन करण्याच्या बेतात होता. पण पोलिसांनी 9 मार्च रोजीच त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केल्याने दुसर्‍या देशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यानंतर नाशिक पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने त्याला त्याच्या घरातून अटक करण्याची योजना आखली. तो राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरात झडती घेत असल्याचे चित्र उभे केले. त्यानुसार, त्यांनी विविध घरांत शोधाशोध सुरू केली. याचाच एक भाग म्हणून काही पोलिस अशोक खरातच्या घरात शिरले. त्यांनी तिथे शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना खरात घरातच हजर असल्याची बाब निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी त्याला कोणतीही संधी न देता त्याला अटक केली. या अनपेक्षित कारवाईमुळे भोंदू खरातला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

अटक करणार्‍या पोलिसांना दिला शाप
उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणी एफआयआर दाखल करणार्‍या अधिकार्‍यांनाही या अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले. पोलिसांनी अचानक अटक करताच भोंदू खरात संतापला. त्याने पोलिसांना तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल, असा शाप दिला. एवढेच नाही तर त्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्याला आपल्या गाडीत कोंबून ठाण्यात आणले. सध्या 24 मार्चपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !