भुसावळ हादरले : प्रेम विवाहाच्या रागातून तरुणाला नग्न करीत बेदम मारहाण : पाच आरोपींना अटक
Bhusawal Shaken : Youth Stripped Naked and Brutally Beaten in Act of Retaliation Over Love Marriage; Five Accused Arrested भुसावळ (22 मार्च 2026) : एखाद्या सिनेमाच्या कथानकाला साजेशी ठरणारी घटना भुसावळात घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणाने प्रेमविवाह केल्याने त्याचा राग येवून त्याला नग्न अवस्थेत खांब्याला बांधून मारहाण करण्यात आली तसेच पत्नीचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच पाच आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
असे आहे मारहाण प्रकरण
चेतन दिलीप जंगले (25, रा.खडका) या तरुणाने शिवपूर गावातील एका तरुणीशी 18 मार्च 2026 रोजी नाशिक येथील पंचवटी येथे प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघांनी नातेवाईकांना माहिती दिली. 19 मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिल्यानंतर ते चेतनच्या मामाच्या घरी मुक्कामी असतानाच शुक्रवार, 20 मार्च रोजी सकाळी 11.30 ते 12.00 वाजण्याच्या सुमारास तरुणीचे नातेवाईक मनोज पाटील, रुपाली उर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील व इतर 10 ते 12 जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करीत नवतरुण विवाहितेला मारहाण करीत तिला इच्छेविरुद्ध जबरदस्तीने पळवून नेले.

आरोपीला ठार मारण्याचा प्रयत्न
संशयीत आरोपींनी चेतन जंगले याला घरातच बेदम मारहाण केली. रुमालाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्याला बाहेर ओढून नेऊन खांब्याला बांधून नग्न केले व लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. मुलीला सोडून दे, असा जबरदस्ती कबुलीजबाब घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
खडका येथेही केली मारहाण
संशयीत आरोपींनी तरुणाला मोटारसायकलवरून खडका येथे आणत घरापर्यंत मारहाण केली. घरी येऊन आई-वडिलांना मारहाण व शिवीगाळ करत घर जाळून टाकण्याची धमकी दिली. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून चेतनची सुटका केली.
जखमी अवस्थेत चेतन याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पुढील तपास करीत आहेत.
वरिष्ठ अधिकार्यांची घटनास्थळी भेट
घटना उघडकीस आल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतल. कोमल प्रकाश पाटील (24), विजय नरोत्तम पाटील (52), हेरंब महेश चौधरी (19), ज्ञानेश्वर भास्कर भोई (19) व संजय सोनू बढे (61) या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून 25 मार्चपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
