चोपडा तालुक्यात धाडसी घरफोडी : आठ लाखांच्या ऐवजावर डल्ला
Audacious Burglary in Chopda Taluka : Loot Worth Eight Lakhs Stolen चोपडा (22 मार्च 2026) : चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री एका शेतकर्याच्या घरात अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून आठ लाख सहा हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
काय आहे प्रकरण ?
बुधगाव येथील रहिवासी रवींद्र तुळशीराम वाघ (61) हे शेतकरी असून आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवार, 20 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रवींद्र वाघ, त्यांच्या पत्नी मंगलाबाई आणि आई इंदुबाई हे जेवण करून झोपी गेले होते. शनिवार, 21 मार्चच्या पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास मंगलाबाई यांना घरातील कपाटाचा आवाज आल्याने जाग आली. त्यांनी कपाटाजवळ जाऊन पाहिले असता, पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला, उंच आणि सडपातळ बांध्याचा एक अज्ञात इसम कपाटातून साहित्य काढत असल्याचे दिसले. मंगलाबाईंना पाहताच चोरट्याने तेथून पळ काढला.

लाखोंच्या ऐवजावर डल्ला
चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता. कपाटाच्या चाव्या तिथेच ठेवलेल्या असल्याने चोरट्याचे काम सोपे झाले. त्याने कपाटातील लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच बाजूच्या खोलीचे कुलूप तोडून तेथील 5000 रुपये रोख (500 च्या 6 आणि 200 च्या 10 नोटा) आणि देवघरातील चांदीची माळही चोरून नेली.
घटनेनंतर मंगलाबाई यांनी आरडाओरडा केल्यावर नातेवाईक ललित पाटील, प्रकाश पाटील आणि प्रवीण पाटील यांनी चोरट्याच्या दिशेने धाव घेतली, मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब बाळसाहेब घोलप, चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करत आहेत.
