भोंदू अशोक खरात प्रकरणातील पीडीतांचे फोटो, व्हिडिओ शेअर केल्यास दाखल होईल गुन्हा !


A case will be registered if photos or videos of the victims involved in the ‘fraudster Ashok Kharat’ case are shared! नाशिक (23 मार्च 2026) : राज्यात गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात सोशल मिडीयावर महिलांचे फोटो व व्हिडिओ प्रसारीत केले जात असून या प्रकरणात आता नाशिक सायबर पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे. पीडितांची बदनामी करणार्‍या आणि त्यांची ओळख उघड करणार्‍या समाजकंटकांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

कारखान्यांमुळे राज्यभरात खळबळ
भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली असून खरात सध्या अटकेत आहे. आरोपीच्या ट्रस्टवरील सदस्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, काही विकृत मानसिकतेचे लोक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे बनावट तसेच आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या निरपराध महिलांचे फोटोही चुकीच्या पद्धतीने वापरले जात असून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. सायबर पोलिसांनी अशा सर्व संशयास्पद पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.


पीडितेची ओळख उघड करणे कायदेशीर गुन्हा
कायद्यानुसार कोणत्याही लैंगिक अत्याचारातील पीडित महिलेची किंवा तक्रारदाराची ओळख सार्वजनिक करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तरीही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरवली जात आहे. पीडितांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती शेअर करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस यंत्रणेने दिला आहे.

सायबर पोलिसांचे ‘स्पेशल मॉनिटरिंग’
प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, सायबर पोलिसांनी विशेष पथकाद्वारे सोशल मीडिया मॉनिटरिंगला प्राधान्य दिले आहे. केवळ पोस्ट तयार करणारेच नव्हे, तर त्या फॉरवर्ड करणारे आणि अशा ग्रुप्सचे अ‍ॅडमिनही पोलिसांच्या रडारवर आहेत. तपासात अडथळा निर्माण होईल किंवा प्रकरणाला वेगळे वळण लागेल, अशा कोणत्याही कृत्यावर पोलिस कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !