निलंबन टळले : सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोषी मुख्यालयात हजर
Suspension Averted: Satara Superintendent of Police Tushar Doshi Reports to Headquarters सातारा (26 मार्च 2026) : विधी मंडळ अधिवेशन कार्यकाळात उपसभापती नीलम गोर्हे यांनी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींचा आदेश रद्द केल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे गुरुवारी आपल्या मुख्यालयात हजर झाले. तुषार दोशी आज आपल्या कार्यालयात हजर झाल्याने त्यांचे निलंबन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय घडले निवडणुकीत ?
जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषद सभागृहात घेऊन जाताना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती.झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि त्यांच्या काही अधिकार्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर सभागृहात उपसभापती नीलम गोर्हे यांनी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देशही दिले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे सांगितले.

सभापती, उपसभापती आणि तालिका अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातही त्यांनी कायदेशीर बाजू तपासण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यातच, अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी सभापती राम शिंदे यांनी नीलम गोर्हेंनी दिलेले आदेश रद्द केले.
या घटनाक्रमानंतर पोलिस अधीक्षक दोशी हे आज दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली किंवा त्यांचे निलंबन झालेच नाही, हे स्पष्ट झालं आहे.




