भोंदू खरातला 39 आमदार भेटले मग माझेच नाव का ? माजी मंत्री दीपक केसरकर


मुंबई (27 मार्च 2026) : सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नाशिक भोंदू अशोक खरातसोबत पूजा केल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावरही टीका सुरू झाली होती तर या विषयी त्यांनी आपले मत व्यक्त करताना भोंदू अशोक खरातला तब्बल 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का घेतले जाते? मी फक्त एकदाच ईशान्येश्वर मदिरात पूजा केली त्यामुळे केवळ ओळख असल्यामुळे एका व्यक्तीविषयी काहीतरी बोलणे साफ चुकीचे आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मी तर देवभक्त
दीपक केसरकर यांना भोंदू अशोक खरातशी असणार्‍या त्यांच्या संबंधांवरून टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी उपरोक्त शब्दांत स्पष्टीकरण देत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मी देवभक्त आहे. मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे, ते शिर्डीच्या येण्याच्या रस्त्यात आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी दर्शनासाठी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कोणत्या महादेव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले. त्या निमित्ताने अशोक खरातशी ओळख झाली.


तर मला दोषी म्हणा
आता ओळख झाली म्हणजे त्याच्या कोणत्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्याच्याकडून जे चुकीचे कृत्य घडले आहे, त्यासाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे.

खरातच्या भोंदूपणाची जराही कल्पना आली नाही
पत्रकारांनी यावेळी दीपक केसरकर यांना अशोक खरातच्या भोंदूपणाविषयी तुम्हाला जराही कल्पना का आली नाही? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले. मी मंत्री असतानाही येथे येत होतो तेच दुर्दैव आहे. पण तेव्हा माझ्यासोबत पोलिसही असायचे. त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. अन्यथा त्यांनी मला सांगितले असते. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते. त्यांच्यासाठी मी खूप काम केले आहे. ते नेहमी मला सांगायचे की, तुम्ही शिक्षणासाठी जेवढे काम केले, तेवढे कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी केले नाही. मग त्यांना या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनीही मला सावध केले असते.

ईशान्येश्वरमध्ये फक्त एकदाच पूजा केली
मी फक्त एकदा ईशान्येश्वरमध्ये पूजा केली. त्यानंतर कोणतीही पूजा-अर्चा केली नाही त्यामुळे केवळ ओळख असल्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी बोलणे साफ चुकीचे आहे. एवढे जण भेटून गेले, जवळपास 39 आमदार भेटून गेले. मग माझेच नाव का? हा प्रश्न मला पडला आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !