चहा पिण्यासाठी बाहेर पडताच भीषण अपघात ; चौघे तरुण ठार
अमरावती (7 एप्रिल 2026) : चहा पिण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याने चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, बेलोरा विमानतळाजवळ सोमवारी रात्री घडला. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण बडनेराच्या जुनी वस्ती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
काय घडले तरुणांसोबत ?
बडनेरा येथील श्रज्ञी तरुण सोमवारी उशिरा रात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले व मध्यरात्रीच्या सुमारास चहा घेऊन ते परत येत असताना त्यांच्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर वेगात धडकली. या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.


यांचा ओढवला मृत्यू
मृत्यू झालेल्यांमध्ये मोहम्मद अनस मोहम्मद सईद (20), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (22), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (26) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (22) यांचा समावेश आहे. हे सर्वजण बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रहिवासी असून एकाच भागातील चार तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत उर्वरित तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.





