लाचखोर विलास लाडच्या ऑडिओ क्लिपवरून विजय वडेट्टीवार आक्रमक ; म्हणाले कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले !


Vijay Wadettiwar takes an aggressive stance over audio clips involving the corrupt Vilas Lad; asserts that a sacred festival like the Kumbh Mela has been turned into a breeding ground for corruption! मुंबई (7 एप्रिल 2026) : मुंबईतील मंत्रालयात सहा लाख 37 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेला कक्ष अधिकारी विलास लाड याची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्याने केलेल्या दाव्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असताना यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला अक्षरशः भ्रष्टाचाराचे कुरण बनवणार्‍या सत्ताधार्‍यांचा एक-एक पराक्रम आता उघड होत आहे. लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याची एक ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यात तो अधिकारी कुंभमेळ्याचे अनेक टेंडर ‘मॅनेज’ झाल्याचा, कोट्यवधी रुपयांच्या कमिशनचा दावा करत आहे. या प्रकरणाची, या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात कोण-कोण मंत्री, अधिकारी सामील आहेत हे समोर आले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

काय आहे क्लीपमधील दावा
कक्ष अधिकारी विलास लाड यांनी त्या ऑडीओ क्लीपमध्ये नाशिक कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या कथित क्लिपमध्ये कुंभमेळ्यासाठीची सुमारे 1021 प्रकारची कामे ‘मॅनेज’ करून ठराविक लोकांना दिली जाणार असून, त्यातून कोट्यवधींचे कमिशन मिळणार असल्याचे लाड बोलताना दिसत आहे.


विलास लाडकडून कोट्यवधींच्या कमिशनचे आमिष
एसीबीच्या अटकेत असलेला मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत असून, यात त्याने नाशिक कुंभमेळ्यातील निविदा प्रक्रिया आणि त्यातून मिळणार्‍या कमिशनबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या संभाषणात तो समोरच्या व्यक्तीला कोट्यवधींच्या कमिशनचे आमिष दाखवताना आणि टेंडर ‘मॅनेज’ करण्याबाबत बोलताना ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमधील विलास लाडच्या विधानांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता समोर आलेली नसली तरी या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

500 कोटींचा मोठा कोटा असल्याचा दावा
राज्य आणि केंद्र सरकारकडून कुंभमेळ्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील 500 कोटींचा मोठा कोटा आपल्याकडे असल्याचा दावा विलास लाडने या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. यामध्ये त्याने स्वतः 700 तंबूंचे काम, ई-टॉयलेट आणि साफसफाईची टेंडर्स मिळवल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 18 कोटींचे नाश्ता आणि जेवणाचे कंत्राटही आपल्याकडेच असून 40 दिवसांच्या या सोहळ्यात प्रत्यक्ष खर्च कमी आणि कमिशनचे प्रमाण मोठे असल्याचे प्रलोभन तो समोरच्या व्यक्तीला देताना दिसत आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने याबाबत ऑनलाईन वृत्त दिले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !