देशाच्या निवडणूक इतिहासात प्रथमच ईव्हीएमची ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ ; नेमके काय होणार ?
For the First Time in the Country’s Electoral History: A ‘Diagnostic Test’ of EVMs—What Exactly Will Happen? मुंबई (10 एप्रिल 2026) : ईव्हीएम निकालावर सातत्याने टीका होत असतानाच या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशाच्या निवडणूक इतिहासात प्रथम ईव्हीएमची ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्यानंतर आता मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रांची 16 आणि 17 एप्रिल रोजी ’डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे नेमकी टेस्ट
सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल 2024 मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’चे (बीईएल) तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करतील. या प्रक्रियेत यंत्राच्या ‘बर्न मेमरी’मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाईल.


निकालावर टांगती तलवार
2024 च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीतून शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी नसीम खान (काँग्रेस) यांचा अत्यंत निसटत्या फरकाने पराभव केला मात्र मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी या तक्रारीची दखल घेत तपासणीचे आदेश दिल्याने सध्याच्या निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
काय आहे ‘डायग्नोस्टिक टेस्ट’?
ईव्हीएमच्या मायक्रोकंट्रोलरमधील प्रोग्रामिंगची पडताळणी करणे
निवडणूक निकालानंतर यंत्रातील डेटाशी छेडछाड झाली आहे का, याची तांत्रिक खातरजमा करणे
सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन नियमावलीनुसार होणारी ही देशातील पहिलीच चाचणी
तर विजयाच पहिला टप्पा
हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. 16 आणि 17 एप्रिलला होणार्या या तपासणीतून सत्य जनतेसमोर येईल, असे मत या प्रकरणी याचिकाकर्ते नसीम खान यांनी व्यक्त केले.
20,625 मतांच्या फरकाने नसीम खान पराभूत
चांदिवली विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते. 2019 च्या निवडणुकीत अवघ्या 409 मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवणार्या लांडेंनी 2024 मध्ये मात्र ही आघाडी तब्बल 20,625 मतांपर्यंत खेचून नेली. चांदिवलीत एकूण 53% मतदान झाले. यात दिलीप लांडे यांनी 1,24,641 मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला, तर नसीम खान यांना 1,04,016 मतांवर समाधान मानावे लागले.






