अशोक खरात चौकशीत म्हणाला, मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही !
During the interrogation, Ashok Kharat said, “I don’t think I will get out of here.” नाशिक (11 एप्रिल 2026) : नाशिकचा भोंदू अशोक खरात सातत्याने दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दररोज चौकशी होत असल्याने तो खचला असल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान त्याने, मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे,, असे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आतापर्यंत 15 गुन्हे दाखल
अशोक खरातला अटक झाल्यापासून त्याच्याविरोधात एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. एका प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोच दुसर्या प्रकरणात त्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या एसआयटीकडून त्याची दररोज आठ ते दहा तास चौकशी होत असून, या प्रक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती ढासळल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात सुमारे 15 गुन्हे नोंदवण्यात आले असून, सध्या तिसर्या गुन्ह्याच्या तपासावर भर दिला जात आहे.

आरोपीची बँक खाती गोठवली
एसआयटीने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावरील तीन बँक खाती गोठवली आहेत. नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरमधील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. संशयास्पद व्यवहारांमुळे खरातच्या मालमत्तांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्ह्यांचा तपासही अधिक गतीने सुरू आहे.
खरात अधिकच कोंडीत सापडला
अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, त्याच्याविरोधातील पुरावे वाढत आहेत. एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासामुळे त्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मानसिक तणाव आणि वाढते गुन्हे यामुळे खरात अधिकच कोंडीत सापडला आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






