सबगव्हाण टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांची दादागिरी : कुटूंबावर प्राणघातक हल्ला करीत महिलांचाविनयभंग


High-handedness by Staff at Sabgavhan Toll Plaza: Deadly Assault on a Family, Accompanied by Molestation पारोळा (14 एप्रिल 2026) :  पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोल नाक्यावर किरकोळ वादानंतर टोल कर्मचार्‍यांनी दादागिरी करीत एका कुटूंबावर लाठ्या-काठ्या, लोखंडी बादलीने प्राणघातक हल्ला केला शिवाय महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना रविवार, 12 एप्रिल रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली. आरोपींविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोल कर्मचार्‍यांच्या वाढत्या दादागिरीचा सर्व स्तरातून निषेध केला जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

काय घडले टोल नाक्यावर ?
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणार्‍या महिला ह्या आपल्या दोन मुलांसह दिराणी व पुतण्या यांच्यासोबत रविवार, 12 एप्रिल रोजी जळगाव येथून धुळे येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी कार क्रमांक (एम.एच.19 ई.पी.8530) ने निघाले होते. रविवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास पारोळा ते सबगव्हाण दरम्यानच्या टोलनाक्यावर पोहचले. फास्टॅगमुळे टोल आपोआप कट झाला असेल या समजातून महिलेच्या मुलाने गाडी पुढे नेली मात्र त्याचवेळी टोलचा बूम अचानक कारच्या बोनटवर पडला.



शाब्दीक वाद पोहोचला हाणामारीवर
याबाबत विचारणा करण्यासाठी महिलेचा पुतण्या हा गाडीखाली उतरला असता, टोल कॅबिनमधील कर्मचार्‍यांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वाद मिटवण्यासाठी पीडीत महिलेसह त्यांची कारमधील सर्वांनी धाव घेवून मध्यस्थीचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने येथे टोल नाक्यावरील व्यवस्थापक शरद पुंडलिक चौधरी (रा.मुकटी, ता.धुळे), समाधान दयाराम सरदार (सावखेडा), गोरख रोहिदास पाटील (मुकटी, ता.धुळे), निलेश आनंदराव खेमनाथ (गोकुळ नगर, धुळे), तुकाराम किसन गवळी (दळवेल, ता.पारोळा) यांच्यासह या टोलनाक्यावर काम करणारे इतर 5 ते 6 कर्मचारी यांनी दोन्ही महिलांना अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.

या मारहाणीमध्ये दोन्ही महिलांना त्यांच्या पायावर व कमरेवर वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नाही तर दोन्ही महिलांचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून एका महिलेच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तर दुसर्‍या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची पोत गहाळ झाली आहे.

पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात वरील संशयीतांसह टोलनाक्यावर काम करणार्‍या पाच ते सहा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !