मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू


जळगाव (16 एप्रिल 2026) : सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून 7 एप्रिल 2026 पासून पूर्वीची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पोर्टल माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.

नवीन पोर्टलबाबत मार्गदर्शन
आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव यांच्या वतीने संलग्नित रुग्णालयांसाठी नवीन पोर्टल प्रणालीसंदर्भात प्रशिक्षण/मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ चौधरी (अध्यक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव) यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. रितेश पाटील (राज्य समन्वयक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी नवीन पोर्टलच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व संबंधितांनी एक टीम म्हणून समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मा. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जळगाव.श्रीमती वैशाली चव्हाण यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा गरजू व गरीब रुग्णांच्या मदतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून नवीन पोर्टल प्रणालीमुळे या योजनेचा लाभ पात्र रुग्णांपर्यंत अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रशिक्षण कार्यक्रमास शासकीय होमिओपॅथी हाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि प्राध्यापक जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या राज्यातील विविध जिल्हे व विभाग समन्वयक आहे त्यांची पण उपस्थिती होती. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 जळगाव जिल्ह्यातील 1610 रुग्णांना एकूण र.133304000/-(तेरा कोटी, तेहतीस लाख आणि चार हजार)सहाय्यता निधी, मदत स्वरुपात प्राप्त झाली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी संलग्नित एकूण 40 रुग्णालये जळगाव जिल्ह्यात सेवेसाठी उपलब्ध आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !