कर्जोतला 33/11 केव्ही उपकेंद्राचे 20 एप्रिलला भूमिपूजन ; वीजपुरवठा होणार अधिक सक्षम


रावेर (18 एप्रिल 2026) : रावेर तालुक्यातील कर्जोत येथे 33/11 केवी उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ सोमवार, 20 एप्रिल 2026 (सोमवार) रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. सुमारे 1.94 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

यांची असेल उपस्थिती
अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित असतील. भूमिपूजन आमदार अमोल जावळे यांच्याहस्ते होईल.


या उपकेंद्रामुळे सध्या 132/11 केवी रावेर उपकेंद्रावर असलेला लोड कमी करून विविध फीडर्सची विभागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा अधिक स्थिर, अखंड आणि दर्जेदार होणार आहे.

अहिरवाडी शेती फीडर संदर्भात सध्या रावेर उपकेंद्रावरील भार कमी करून त्याचे दोन भाग करण्यात येणार आहेत. यात रावेर ग्रामीण व भोकरी शिवार भागाला सुधारित वीजपुरवठा मिळेल, तर नव्या कर्जोत उपकेंद्रातून वाघोड, कर्जोत व पाडळा शिवार येथे अधिक गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा उपलब्ध होईल.

तामसवाडी गावठाण फीडरची देखील दोन भागांत विभागणी करण्यात येणार आहे. यामध्ये रासलपूर (काही भाग), भोकरी शिवार व शिंदखेडा गावांना रावेर उपकेंद्रातून सुधारित वीजपुरवठा मिळेल, तर कर्जोत उपकेंद्रातून वाघोड, अहिरवाडी, कर्जोत, मोहगण व तामसवाडी या गावांना अधिक स्थिर व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळणार आहे.

या उपकेंद्रामुळे व्होल्टेजमधील चढ-उतार कमी होऊन शेतीपंपांना नियमित वीज उपलब्ध होणार आहे. परिणामी शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !