पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण : सोयगावच्या तरुणाचा धुळ्याजवळ अपघाती मृत्यू
Dream of Joining Police Force Unfulfilled: Youth from Soygaon Dies in Accident Near Dhule सोयगाव (19 एप्रिल 2026) : पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धुळ्याकडे निघोल्या सोयगाव तालुक्यातील 24 वर्षीय तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, 17रोजी रात्री आठ वाजता धुळे जिल्ह्यातील बाबरे गावाजवळ घडला. बबलू तालेब पठाण (24) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण
सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथून धुळे येथे मोटारसायकलवर पोलीस भरतीसाठी जाणार्या बबलू पठाण या तरुणाच्या दुचाकी (एम.एच.20 ई.डी.1666) ला धुळेजवळील बाबरे गावाजवळ समोरून येणार्या ट्रक (आर.जे.11 जी.बी.5137) ने जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी दुपारी तीन वाजता नांदगाव तांड्यात दफनविधी करण्यात आला.

नांदगाव तांड्यात शोककळा
बबलू पठाण हा तरुण धुळे येथे पोलीस भरतीच्या अनुषंगाने जाण्यासाठी निघाला होता. शनिवारी त्याची मैदानी चाचणी होती पोलीस होण्यासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यूने झडप घातली त्यामुळे नांदगाव तांड्यात शोककळा पसरली. तरुणाच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याने पोलीस भरतीसाठी अनेक दिवसांपासून मेहनत घेतली होती. याच उद्देशाने त्याने विवाहही पुढे ढकलला होता. कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्याचा साखरपुडाही झाला परंतु पोलीस होण्याआधीच त्याच्यावर क्रुर काळाने झडप घातली.


