राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात
NCP (Sharadchandra Pawar) President Sharad Pawar at Breach Candy Hospital. मुंबई (21 एप्रिल 2026) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती कारणास्तव मुंबई स्थित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्या काही टेस्ट सुरू असून त्या झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयीची स्पष्टता येईल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार यांना मागील महिन्यातच पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज प्रचाराचा अखेरचा दिवस
मंगळवारी बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंगळवारी बारामतीत सांगता सभा आहे. या सभेला महाविकास आघाडीतर्फे स्वतः सुप्रिया सुळे हजर राहणार आहेत. स्वतः सुनेत्रा पवार यांनी त्यांना सभेचे निमंत्रण दिले आहे. या सभेची माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची उपरोक्त माहिती दिली. त्या म्हणाल्या, शरद पवार आजच्या सांगता सभेला उपस्थित राहणार नाहीत. कारण, ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. तिथे त्यांच्या काही टेस्ट सुरू आहेत. त्या झाल्यानंतरच याविषयीची स्पष्टता येईल.

सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला जाणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीला मंगळवारी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा होत आहे. मला कालच त्यांचा फोन आला होता. त्यांनी मला कुटुंब म्हणून प्रचाराला येण्याचे निमंत्रण दिले. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वप्रथम ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा निर्णय घेतला होता. आम्ही पहिली भूमिका मांडली. त्यानंतर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांनीही सहकार्याचीच भूमिका घेतली. आज महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे मी कुटुंब म्हणून त्यांच्या सभेला जाईल. पण मित्र पक्ष म्हणून माझ्याही काही जबाबदार्या आहेत त्यामुळे नैतिकता म्हणून मी काल काँग्रेस व उद्धव ठाकरेंशीही बोलले. दोन्ही पक्षांची सहकार्याची भूमिका आहे. त्यांचे म्हणणे होते की, तुम्ही कुटुंब म्हणून जाणार असाल तर जा आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलाच आहे. त्यामुळे मी सभेला जाऊन सुनेत्रावहिनींना शुभेच्छा देईन.


