एरंडोलमध्ये आमदारांचे ठिय्या आंदोलन : जळगावातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍याविरोधात अखेर खंडणीचा गुन्हा


MLA Stages Sit-in Protest in Erandol : Extortion Case Finally Registered Against Jalgaon FDA Official एरंडोल (22 एप्रिल 2026) : शहरातील एका चहा विक्रेत्याकडे गुटखा नसतानाही त्याच्यावर कारवाईची भीती घालून जळगावातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी दहा हजारांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह एरंडोल पोलीस ठाणे गाठत तब्बल चार तास ठिय्या मांडल्यानंतर जळगावातील अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर व अन्य चार अनोळखींविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्ताधारी आमदारालाच खंडणी प्रकरणात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर या आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा आहे.

आमदारांसह कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या
एरंडोल शहरातील एका चहा विक्रेत्याकडे गुटखा असल्याची भीती घालून जळगावातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सोमवारी दुपारी 12.30 वाजता येत संबंधित विक्रेत्याला गुन्हा दाखल करून कारवाईची भीती घातली.

आमदार अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना या बाबीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एरंडोल पोलीस ठाणे गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले. वारंवार मागणी करूनही तत्काळ गुन्हा दाखल होत नसल्याने आमदार अमोल पाटील यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. दुपारपासून सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनानंतर अखेर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित अधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते यांनी यावेळी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या अधिकार्‍याविरोधात गुन्हा : कारवाईकडे लागले लक्ष
41 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून किशोर हिंमतराव बाविस्कर (जळगाव) व इतर अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कुठल्याही प्रकारची प्रतिबंधीत तंबाखू विकत नसताना संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या ताब्यातील गुटखा फिर्यादीच्या नावावर दाखवून त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवली व दहा हजारांची खंडणी बाविस्कर व त्यांच्यासोबतच्या चार जणांनी उकळली, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. तपास एपीआय शंकर पवार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !