बारामती पोटनिवडणूक भावनिक क्षण : मतदानावेळी सुनेत्रा पवार भावूक


Baramati Bypoll: An Emotional Moment — Sunetra Pawar Gets Emotional While Voting बारामती (23 एप्रिल 2026) : बारामती व राहुरी विधानसभेसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. बारामती येथील निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्या क्षणी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेक वर्षे बारामतीसाठी काम करणार्‍या अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. या घटनेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावनिक रंग अधिक गडद झाल्याचे दिसून आले.

निवडणुकीत यांच्यात होणार प्रमुख लढत
निवडणुकीत प्रामुख्याने सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) विरोधात राघू घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), करुणा धनंजय मुंडे (अपक्ष) व अभिजीत बिचुकले (अपक्ष) यांच्यात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवारांत लढत होणार राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे रिंगणात आहेत. 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागेल.

भविष्यात बारामतीत पवार विरुद्ध पवार, अशी लढत : रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनीही 2029 च्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, भविष्यात बारामतीत पवार विरुद्ध पवार, अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना अशी लढत नको आहे पण काही जण त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे येत्या काळात बारामतीतील राजकारण अधिकच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : जय पवार
मतदानाबाबत बोलताना जय पवार यांनी बारामतीकरांच्या उत्साहाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, यावेळी लोकांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे. मोठ्या प्रमाणात मतदान होईल, अशी आम्हाला आशा आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी सर्व पोलिंग एजंट्सशी संपर्क साधला असून मतदानाची टक्केवारी 85 ते 90 टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्या विजयाबाबतही जय पवार आशावादी दिसले. दादांनी जसं प्रेम मिळवलं, तसंच प्रेम वहिनींनाही मिळेल. त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मात्र किती मतांनी विजय होईल याबाबत बोलताना त्यांनी सावध भूमिका घेत, ते निकालानंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले.

राहुरी मतदारसंघात 170 पैकी 163 जणांनी केले होम मतदान
राहुरी निवडणुकीसाठी 36 पोलिस अधिकारी, 708 पोलिस कर्मचारी आणि 391 होमगार्ड तैनात आहेत. 34 सेक्टर अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, मतदान संपल्यानंतर साहित्य संकलनाची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. 85 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांगांसाठी होम मतदान” सुविधेअंतर्गत 170 पैकी 163 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

एकूण मतदार: 3,33,545 पुरुष मतदार: 1,72,231
महिला मतदार: 1,61,312 एकूण मतदान केंद्रे : 374

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !