विद्यार्थी सेनेला बळ, रिक्त पदे भरणार ; भुसावळमध्ये मनसेची रावेर लोकसभा बैठक उत्साहात


Student Wing Strengthened, Vacant Posts to be Filled ; MNS Holds Enthusiastic Meeting for Raver Lok Sabha Constituency in Bhusawal भुसावळ (26 एप्रिल 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रावेर लोकसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक रविवारी शहरात उत्साही व उर्जादायी वातावरणात पार पडली. नवनिर्वाचित संपर्क अध्यक्ष संदीप पाचंगे (मुंबई) व आशिष साबळे (पुणे) यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आणि आगामी वाटचालीसाठी ठोस दिशा निश्चित करण्यात आली.

नियोजन व उणिवांवर चर्चा
या बैठकीस भुसावळ, जामनेर, रावेर व मुक्ताईनगर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तालुकानिहाय आढावा घेत प्रत्येक भागातील संघटनाची ताकद, उणिवा आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साही सहभागामुळे बैठकीला विशेष ऊर्जा प्राप्त झाली.

विद्यार्थी सेनेला सक्षम करण्याचे आवाहन
संपर्क अध्यक्षांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी सेनेला सक्षम करण्यावर विशेष भर दिला. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये अफाट ऊर्जा असते; त्या ऊर्जेला संघटनात्मक रूप देण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनसेची शाखा उभी राहिली पाहिजे, असे ठामपणे सांगत युवकांना संघटनेशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले. युवकांच्या सहभागाशिवाय मजबूत संघटना उभी राहू शकत नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले.

संघटनेतील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जाणार असून गट व गण अध्यक्षांच्या नियुक्त्यांनाही गती दिली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी करण्यात आली. नव्या चेहर्‍यांना संधी देत सक्षम नेतृत्व उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रत्येक स्तरावर जबाबदार्‍या स्पष्ट करून संघटनेला अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीदरम्यान पदाधिकार्‍यांनी आपल्या भागातील समस्या, अडचणी आणि अपेक्षा मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सभासद नोंदणी मोहिमेला वेग देऊन प्रत्येक गाव, प्रत्येक विभागात मनसेची उपस्थिती मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.

एकंदरीत ही बैठक रावेर लोकसभा मतदारसंघात मनसेची संघटना नव्या जोमाने उभी करण्याच्या दिशेने निर्णायक ठरली. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती निर्माण करणारी ही बैठक पुढील राजकीय वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

प्रसंगी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, संजय नन्नवरे, शहराध्यक्ष दीपक सानवणे, विलास कोळी, दशरथ सपकाळे, सुशील मोरे व पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !