आठवणीतील माहेर कार्यक्रमात भुसावळात ‘स्त्री सखींनी उडवली धमाल’

प्रतिष्ठा महिला आयोजन : विजेत्या सखींचा आकर्षक बक्षिसाने गौरव


‘Women Friends Have a Blast’ at the ‘Memories of the Maternal Home’ Event in Bhusawal भुसावळ (2 मे 2026) : स्त्रीच्या आयुष्यातील खरे खुरे नंदनवन म्हणजे तिचे माहेर व याच माहेरी अक्षयतृतीयेला सासरवाशीन येवून घरच्यांसोबत रमते, झोके खेळते, आंब्याचा रस, पुरणाची पोळी, कुरडई-पापडांचा आस्वाद घेते मात्र आधूनिक युगातील बदलत्या जीवनशैलीत हे चित्र जवळपास दुरापास्त ठरू पाहत आहे मात्र भुसावळातील उपक्रमशील प्रतिष्ठा महिला मंडळाने या जुन्या आठवणी पुन्हा ‘आठवणीतले माहेर’ या कार्यक्रमातून ताज्या केल्या. शहरासह तालुक्यातील सहाशेवर महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्यातील कलागुण सादर करीत उपस्थितांनाही थक्क केले. यावेळी लकी ड्रॉ विजेत्या सखींना आकर्षक पैठणी देण्यात आली तर ‘गेम्स शो’मध्ये स्त्री सखींनी धमाल केली.

बैलगाडीतून महिलांचे स्वागत : विविध स्पर्धांनी जिंकली मने
शहरातील बालाजी लॉनमध्ये अक्षयतृतीया सणाचे औचित्य साधून शुक्रवार, 2 मे रोजी मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्यातून आयोजित ‘आठवणीतील माहेर’ कार्यक्रमात सजवलेल्या बैलगाडीतून सुवासिनींना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. सर्व महिलांसाठी आंब्याचा रस, पुरणाची पोळी, आमटीचे जेवण देण्यात आले शिवाय सर्व सहाशेवर सवाष्ण महिलांना हळदी-कुंकू देवून ओटी भरण्यात आली. तत्पूर्वी पारंपरिक पद्धत्तीने गौर पूजन करण्यात आले.

स्पर्धेतून कलागुणांची झलक ; ‘गेम्स शो’ त महिलांची धमाल
महिलांसाठी यावेळी सर्वोत्तम भारतीय नववधू (बेस्ट इंडिअन ब्राईडल), समूह नृत्य स्पर्धा (ग्रुप डान्स स्पर्धा), वेशभूषा स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच सुप्त कलागुणांच्या सादरीकरणासाठी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना निवडण्यात आल्यानंतर त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी महिलांसाठी ‘विविध गेम्स शो’ त महिलांनी धमाल केली. सचिन भिडे यांनी महिलांचे विविध गेम्सच्या माध्यमातून मनोरंजन केले. समारोपप्रसंगी डीजेच्या तालावर महिलांनी नृत्य करीत जल्लोष केला.

संस्कृती जोपासण्यासाठी उपक्रम : रजनी सावकारे
सासरी आलेल्या स्त्रीसाठी तिचे माहेर म्हणजे नंदनवनच ! दिवसभराच्या रहाटगाड्यात स्त्रीला स्वतःकडेच पहायला वेळ नाही, उपजत कलागुण असूनही सादरीकरणासाठी व्यासपीठ नाही व माहेरची ओढ असलीतरी कौटूंंबिक जवाबदार्यांच्या ओझ्यामुळे प्रत्येकवेळी जाणे शक्य नाही म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘आठवणीतले माहेर’ हा उपक्रम राबवण्यात येतो. बदलत्या काळाती संस्कृती जोपासण्यासाठी हा उपक्रम असून या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांसाठी दिवसभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या व एका दिवसांसाठी का असेना महिला त्यांच्या भावविश्वात रमल्याचे व कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे समाधान असल्याचे मनोगतात प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी सांगितले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सौ.केदार बारबोले, मोहिनी राहुल वाघ, डॉ.संगीता बियाणी, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सुनंदा औंधकर, भुसावळसह वरणगावच्या नगरसेविका आदींची प्रमुख उपस्थित होत्या.

संस्कृती व परंपरांचे जतन : मंत्री संजय सावकारे
भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमातून संस्कृती व परंपरांचे जतन केले, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले. ‘आठवणीतील माहेर’ या कार्यक्रमातून भुसावळसह तालुक्यातील महिलांना हक्काचे माहेरपण अनुभवण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात मंडळाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी म्हणत या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वीतेसाठी सदस्यांनी घेतले परिश्रम
सूत्रसंचालन राजश्री देशमुख व प्रास्ताविक प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !